NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

  • शिक्षकांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली; हास्यकवी संमेलन ठरले आकर्षण

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये १४ नोव्हेंबर रोजी बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक ऑगस्टीन पिंटो सर आणि संस्थापिका ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी शिक्षकांनी विविध रंगारंग सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र बायबलमधील वचनांचे पठण करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सुमधुर प्रार्थनागीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या हास्यकवी संमेलनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. या संमेलनात शिक्षिका जयश्री दीक्षित, योगिता मुसळे आणि शीतल वाकचौरे यांनी सहभाग घेत आपल्या विनोदी कवितांमधून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले. विद्यार्थ्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. पिंटो सर यांच्या बालदिनानिमित्तच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. शिक्षकांनी सादर केलेल्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि केकचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील आणि विभागप्रमुख शीतल चिंचोलीकर यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी प्रतिसादामुळे सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधील बालदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

Comments are closed.