** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील हॉटेल्स आणि अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. प्रशासनाने एकाच दिवसात नाशिक शहरातील चार हॉटेल्सचे परवाने, तसेच एका अन्न आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांची नावे :
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत खालील पाच आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
- हॉटेल तुषार मिसळ (कॉलेज रोड) – हॉटेलमध्ये अस्वच्छता, अन्नपदार्थ साठविण्यासाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले.
- हॉटेल विहार (जुना गंगापूर नाका) – अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता तसेच कीटक व अन्य उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला.
- हॉटेल श्यामसुंदर (सातपूर एमआयडीसी) – कच्चा अन्नमाल अस्वच्छ परिस्थितीत साठविणे, स्वयंपाकघराची अयोग्य रचना आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
- हॉटेल महाराजा काठियावाडी (आडगाव फाटा, पंचवटी) – स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा, मुदतबाह्य अन्नपदार्थ, अस्वच्छता तसेच धूळ व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे आढळले.
- दुर्गा कॅफे (कृषीनगर, कॉलेज रोड) – अस्वच्छतेसह ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नसणे आणि मेन्यू कार्डवर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा उल्लेख नसल्याचे आढळले.
Comments are closed.