NGN News
Latest Marathi News

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : खा. भास्करराव भगरे

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात दि. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत व योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार भास्करराव भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, गहु,डाळिंब तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामी उत्पन्न नष्ट झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आपत्ती अधिक गंभीर ठरली आहे.
खासदार भगरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, नुकसानग्रस्त भागात त्वरित व वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता अंतरिम मदत देणे गरजेचे असून नुकसान भरपाईचे दरही वाढवावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे.

यासोबतच पीक विमा दाव्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, बाधित शेतकऱ्यांच्या कर्जफेडीस मुदतवाढ व व्याजमाफीचा विचार करावा, तसेच ज्या भागात नुकसान अधिक आहे त्या ठिकाणी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

“शेतकरी हा देशाचा कणा आहे. आज तोच संकटात सापडला असताना शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करणे अत्यावश्यक आहे. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे,” असेही खासदार भगरे यांनी नमूद केले. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाकडून तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.