
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रबोधिनी ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयएमआरटी येथे दिव्यांगांच्या शिक्षकांसाठी उदबोधन शिबिराचे नुकतेचआयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते यजुवेंद्र महाजन हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रबोधिनीच्या तिन्ही विभागांतील शिक्षक व कर्मचारी तसेच इतर दिव्यांग शाळांतील शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाजन यांनी स्व-ओळख, आत्मविश्वास, स्वतःची ताकद ओळखणे, समोर येणाऱ्या परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे जाणे याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे, अधिक संघर्षातूनच मोठे व उज्वल यश मिळते हे त्यांनी प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात ‘दिव्य मराठी’च्या निवासी संपादक दीप्ती राऊत यांनी “मानसिक ताणतणाव व व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संवादाचे महत्त्व अधोरेखित करत, वेळोवेळी संवाद साधल्यास अनेक समस्या सुटतात, तसेच संवादातून परस्परांना आधार व सहकार्य मिळून ताणतणाव कमी करता येतो, असे सांगितले.
शेवटच्या सत्रात ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर यांनी “विशेष मुलांच्या माता-पालकांचे प्रश्न” या अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य केले. विशेष मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या स्वीकारासाठी पालकांचे योग्य समुपदेशन होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रबोधिनीच्या प्रारंभीच्या काही आठवणी सांगत संस्थेशी असलेले त्यांचे ऋणानुबंध अधिक दृढ असल्याचे व्यक्त केले. हे उदबोधन शिबिर अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.
Comments are closed.