NGN News
Latest Marathi News

लपून छपून भेटण्याची आवश्यकताच काय ?.. मुख्यमंत्र्यांचा सवाल

  • उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीसंदर्भात मुद्दा निकाली

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती खुलेपणाने देखील केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की, जे लपवायची आवश्यकता आहे, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर भेट झाल्याचे वृत्त प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून प्रसृत करण्यात आले. विधान परिषद निवडणुक अनुषंगाने भेट झाल्याची चर्चा आहे.  त्यानंतर राज्यभर मोठी खळबळ माजली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या दोघांत अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात. संबंधित खोटारड्या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

‘उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपूनछपून करण्याची आवश्यकता नाहीये. ती अगदी उघडपणे केली जाऊ शकते. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत जे आता लपवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं अशा प्रकारची कोणतीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात, जे अयोग्य आहे.  या खोटारड्या सोशल मीडिया हँडलला नोटिस बजावली जाईल.’

Comments are closed.