NGN News
Latest Marathi News

आदर्शवत: बैठकीसाठी ‘निमा’ सदस्य दुचाकी, इलेक्ट्रिक वाहनाने उपस्थित !

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणे आणि शाश्वत विकासासाठी विवेकपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचे केलेले राष्ट्रीय आवाहन लक्षात घेऊन नासिक इंडस्ट्रीज & मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या कार्यकारिणी सदस्यांनी बुधवारी झालेल्या कार्यकारिणी बैठकीसाठी दुचाकी, इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहतूक तसेच बाईक व कार -पूलिंगचा वापर करून उपस्थिती लावली. काही सदस्यांनी ऑनलाइन सहभागी होत इतरांसमोर इंधन बचतीचा आगळा आदर्श निर्माण केल्याची माहिती निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी दिली.

पंतप्रधानांच्या आवाहनाच्या अनुषंगाने निमाने सर्व उद्योगांना त्यांच्या युनिटमध्ये इंधनाचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. तसेच शक्य त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आणि मालक-कामगार यांच्यात कार व बाईक-पूलिंगची व्यवस्था करून प्रवास अधिक कार्यक्षम करावा, असेही सुचविण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून बुधवारी झालेली बैठक त्याचे उत्तम उदाहरण ठरल्याचे नहार यांनी नमूद केले.

याशिवाय देशांतर्गत अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी उद्योजकांनी अनावश्यक परदेश प्रवास टाळून स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे, तसेच लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यासाठी कच्चा व तयार मालाच्या वाहतुकीचे कार्यक्षम नियोजन करावे. उद्योगातील सर्व संसाधनांचा योग्य वापर करून आदर्श औद्योगिक नेतृत्वाचे उदाहरण निर्माण करण्याचा निमाचा प्रयत्न राहील, असेही नहार यांनी शेवटी सांगितले.

Comments are closed.