NGN News
Latest Marathi News

खरातची भविष्यवाणी, कोकाटे ‘इतक्या’ मताधिक्याने विजयी होतील

  • नामकर्ण आवारे यांच्या पुस्तकातील मजकुराने खळबळ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातील उमेदवार माणिकराव कोकाटे हे साधारण 23 हजार 450 मतांनी निवडून येतील, ही भोंदूबाबा अशोक खरात याने केलेली भविष्यवाणी तंतोतंत ठरली. एव्हढेच नाहीतर कोकाटेंच्या विजयाचा जल्लोष करता येणार नाही. कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू होईल, असे भाकीत देखील खरातने वर्तविले होते. सिन्नरचे उद्योजक नामकर्ण आवारे यांनी 2012 साली लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रातील एका लेखात या दोन्ही घटनांचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास एसआयटी करत असतानाच अचानक आवारे यांच्या पुस्तकातील संदर्भाने मोठी खळबळ उडाली आहे. आवारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात पृष्ठ क्रमांक 182 ते 194 दरम्यान ‘सिद्ध पुरुषांच्या सहवासात’ या शीर्षकाखाली अशोक खरातचा उल्लेख आहे. खरातच्या पहिल्या भेटीपासूनचा संपूर्ण प्रवास यात विस्तारून मांडला आहे. सिन्नरमधील तत्कालीन उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराचे काम नामकर्ण आवारे करत होते. त्यावेळी प्रचारादरम्यान वाद झाल्याने सिन्नर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेले असताना अशोक खरात त्यांना पहिल्यांदा भेटला. त्यावेळी काळजी करू नका. माणिकराव साधारण 23 हजार 450 मतांनी निवडून येतील, असे भविष्य आम्हाला सांगितले. मात्र, विजयाचा जल्लोष करता येणार नाही. कारण निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू होईल, असे भाकीत देखील खरातने वर्तविले, असा संदर्भ आवारे यांच्या पुस्तकात आहे.

दुर्घटनेत दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू

 मतदान पार पडले आणि महिन्याभरानंतर झालेल्या मतमोजणीत माणिकराव कोकाटे खरात यांना केलेल्या भविष्यवाणी प्रमाणेच 23, 450 मतांनी निवडून आले, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मतमोजणी होऊन परतत असताना शिंदे गावाजवळ दुर्घटना घडून खरातने सांगितल्याप्रमाणे दोन कार्यकर्त्यांचा जागेवर मृत्यू झाल्याचा देखील उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. 

Comments are closed.