
** एनजीएन न्यूज नेटवर्क
तुमच्या सात पिढ्यांत कोणी हॉटेल टाकले होते का? हॉटेल टाकणं इतकं सोपं वाटलं का? हॉटेल चालवून चांगले चांगले दमले यांनाही लवकरच हॉटेलचे शटर बंद करावे लागेल,” असे एक ना अनेक कुश्चित बोलणे मी 25 वर्षांपूर्वी खूप ऐकले आहे. व्यवसायाची परंपरा नसताना जो कोणी प्रतिकूल परिस्थितीतून व्यवसायाला सुरुवात करतो, त्याच्या कानावर हे शब्द पडतातच ही “जगरहाटी” आहे आपण व्यवसायावर सरकारी कर “पैशाच्या रूपात” भरत असतो, मात्र हा कर आपण समाजात रहात असल्यामुळे आपल्याला “शब्दाच्या रूपात” हितचिंतकांना द्यावाच लागतो. आणि तो मी मोठ्या प्रमाणात दिला आहे .
नाशिक–त्र्यंबकेश्वरच्या पवित्र रस्त्यावर ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन करण्याची संकल्पना घेऊन 25 वर्षांपूर्वी मी हॉटेल सुरू करण्याचे धाडस केले. ( लोक आता त्याला धाडस म्हणतात, खरे म्हणजे तो माझा भावनिक वेडेपणा-Emotional Madness होता)आपले गाव, बलुतेदार पद्धती, पाटलाचा वाडा, चुलीवरचा स्वयंपाक, पाट-चौरंगावर बसून खास महाराष्ट्रीयन सुग्रास जेवण अशी ही संकल्पना होती. मी ही कल्पना अनेकांना सांगितली; बऱ्याच जणांनी तोंडावर खोटे हसून होकार दिला. काही नातेवाईकांना संकल्पना आवडली, काहींनी मुक होकार दिला. ( एकदा याची हौस होऊन जाऊ द्या असाही सदहेतू असेल)
मी माझी महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याची कल्पना माझ्या सत्तर वर्षांच्या अशिक्षित आईला सांगितली. तिने माझं सर्व नीट ऐकून घेतले आणि ती म्हणाली, “जे करायचं ते जपून करा.” तिची संमती आणि सल्ला माझ्यासाठी खूप मोठा होता. आईने नुसती संमतीच नाही दिली, तर शेवटच्या श्वासापर्यंत माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने संस्कृती मध्ये चुलीवर भाकरी करण्याचं काम केलं. माझ्या आईच्या हातची भाकरी खाल्लेले अनेक जण आजही आईच्या आठवणी सांगतात.
24 मार्च 2002 रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभ हस्ते नाशिक–त्र्यंबकेश्वरच्या पवित्र रस्त्यावर ‘हॉटेल संस्कृती’ची सुरुवात झाली. जुन्या काळातील गावाची दगडी वेस, प्रवेश करताच गणपतीचे मंदिर, आणि पाटील वाड्यात पाट-चौरंगावर जेवण—अशी सुरुवात झाली. तीन एकरच्या जागेत एकही झाड नव्हते. येथे 2500 ट्रक माती आणून भर टाकलेली होती, त्यामुळे झाडे असण्याचा प्रश्नच नव्हता. ‘संस्कृती’ची पायाभरणी कशी झाली आणि तिचा प्रवास कसा झाला, याचे सविस्तर वर्णन माझा मुलगा दिग्विजय मानकर यांनी लिहिलेल्या ‘संस्कृती : एका खडतर प्रवासाची कहाणी’ (2023) या पुस्तकात आले आहे.
‘संस्कृती’चा 24 मार्च 2002 रोजी सुरू झालेला हा प्रवास अनेक खाचखळगे, अडथळे आणि प्रतिकार सहन करत करत आज 24 मार्च 2026 रोजी 24 वर्षे पूर्ण करून 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. म्हणजे आता संस्कृतीचे ‘रौप्यमहोत्सवी वर्ष’ सुरू झाले आहे. व्यवसायाची कोणतीही परंपरा नसलेल्यांसाठी 24 वर्षे हा फार मोठा कालावधी आहे. 24 वर्षे म्हणजे 288 महिने, 8766 दिवस आणि 2,10,384 तास ‘संस्कृती’ अखंडपणे सुरू आहे. गेल्या 24 वर्षांत ‘संस्कृती’ने खूप काही शिकवलं. संस्कृती मधील श्री. गणेशाच्या आशिर्वादाने तसेच माझी आई स्वर्गीय भागुबाई, पत्नी कविता, मुलगा दिग्विजय, मुलगी प्रतिभाताई, डॉ. राजश्री, प्रियदर्शनी, सुनबाई जान्हवी आमच्या कुटुंबाचे सदस्य श्री. दत्तात्रय शेवाळे, संजय कातकाडे, भिमराव खैरनार, मुकेश पाटील,माणिक सानप,करुणा पाटेकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हा प्रवास सोपा झाला.
‘संस्कृती’ ने आमची समाजात स्वतंत्र्य ओळख निर्माण झालीय. गेल्या 24 वर्षात सहन केलेला त्रास, वेदना, अपमान, आर्थिक ओढातान यापेक्षाही आपण या आयुष्यात काहीतरी चांगले निर्माण करू शकलो याचं समाधान खूप मोठं आहे. त्यामुळे संस्कृतीने आयुष्य ‘कृतार्थ’ केलं. माझा मुलगा दिग्विजय संस्कृती परिवाराची जबाबदारी खाद्यावर घेऊन दमदार वाटचाल करीत आहे. ‘संस्कृती’चा हा अखंड प्रवास सुखकर व्हावा म्हणून आमच्यावर सर्व नाशिककरांनी उदंड प्रेम केले. महाराष्ट्रातून, भारतातून तसेच परदेशातून आलेल्या पर्यटकांनी महाराष्ट्रीयन ‘संस्कृती’चा अनुभव घेतला. “परंपरेचे दर्शन आणि आपुलकीचे भोजन” हे ब्रिदवाक्य यशस्वी करण्यासाठी आमचे व्यवस्थापक तसेच सर्व कर्मचारी यांनी अखंड मेहनत घेतली. त्यामुळे हा 24 वर्षाचा प्रवास यशस्वी झाला. हे यश आमच्या संपूर्ण टीमचे आहे.
एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे की,
“कृते यशस्वी संनदन्ति बहवो जना:
अपकृते तु तुषणी तिष्ठन्ति सर्वे।”
एखाद्याला यश मिळाल्यावर त्याचे श्रेय घेणारे बरेच असतात; परंतु संकटात साथ देणारे फार थोडे असतात. त्यामुळे बोलणाऱ्यांकडे जास्त लक्ष न देता आपण आपल्या कार्यात मग्न राहावे. आमचा 24 वर्षांचा प्रवास सुखकर करणाऱ्या सर्व स्नेही, आप्तेष्ट व हितचिंतकांचा मी मनापासून ऋणी आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही वाटचाल अशीच खंबीरपणे पुढे चालू राहील.
धन्यवाद…!
शिवाजी मानकर
संचालक (निवृत्त)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई
Comments are closed.