NGN News
Latest Marathi News

कौटुंबिक समुपदेशन आणि विविध उपचार पद्धती (थेरपी) ( विशेष/मीनाक्षी जगदाळे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

कुटुंब ही मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. प्रेम, आपुलकी आणि सुरक्षितता पुरवणारे हे ठिकाण प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व भावनिक विकासाचा मुख्य आधार असते. परंतु, बदलती जीवनशैली, वैचारिक मतभेद, संवादाचा अभाव आणि वाढता ताणतणाव यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात. अशा वेळी कुटुंबातील नातेसंबंध पुन्हा दृढ करण्यासाठी आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी फॅमिली कौन्सिलिंग म्हणजेच कौटुंबिक समुपदेशन अत्यंत प्रभावी ठरते.

आजमितीला वाढत चाललेले घटस्फोट, आत्महत्या, हत्या, भ्रष्टाचार, अपघात याचे कारण शोधले तर त्याचे मूळ आपल्या घरात म्हणजेच कुटुंबात सापडते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आपण दुर्लक्षित करतो, विसरून जातो अथवा सोडून देतो त्याच घटना आपल्या बाबतीत, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा घडू शकतात याचा फारसा विचार कोणी करत नाही. समाजात, इतर घरात ज्या ज्या अप्रिय घटना आपण घडतांना पाहतो त्यांची लक्षणे वेळेत ओळखू नं आल्यामुळे अथवा कळून पण नं कळल्यासारखे केल्या मुळे त्या घडलेल्या असतात. आपल्या स्वतःच्या बाबतीत अथवा आपल्या घरातील लोकांच्या बाबतीत प्रत्येकजण खूप सतर्क आणि सजग असतो. हा सतर्क पणा घरातील लोकांच्या अन्न वस्त्र निवारा तसेच आरोग्य संबंधित गरजा भागवणे, मुलांचे शिक्षण, नौकरी, व्यवसाय आणि लग्न त्याचप्रमाणे आपल्या कार्यातून समाजात आपले नांव लौकिक वाढवणे अधिक उत्पन्न असल्यास घरोघरी त्यातून बचत करणे, स्वतःच्या कुटुंबाच भविष्य सुरक्षित करणे त्याचप्रमाणे भौतिक गोष्टी आणि विविध सेवा यावर मुबलक पैसा खर्च करणे या बाबतीत असतो. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला काहीही कमी पडू नये हा एकमेव उद्देश प्रत्येकाचा असतो. तरी सुद्धा सर्व काही अलबेल चाललं आहे असं घर सापडणं अवघड असते. अत्यंत उत्तम सांपत्तीक स्थिती, शिक्षण, संस्कार, मालमत्ता सर्वकाही असून पण कौटुंबिक समुपदेशन करताना निदर्शनास येते की कुटुंबातील समस्यांचे मुख्य स्वरूप, सदस्यांचे स्वभाव आणि त्यांच्यातील नातेसंबंधांचे जाळे अत्यंत क्लीस्ट स्वरूपाचे असते. घरातील प्रत्येकाच्या नानाविध अपेक्षा, स्वप्न, ध्येय, वैयक्तिक सवयी आणि स्वभाव यातून एकत्र राहतांना निर्माण झालेल्या समस्या, तक्रारी, वाद विवाद, मतभेद, तिरस्कार आणि अगदी टोकाची भांडणे
लक्षात घेऊन विविध आधुनिक थेरपींचा (उपचार पद्धतींचा) शास्त्रीय वापर करावा लागतो.

आता आपण समुपदेशन मार्फत संपूर्ण कुटुंबाला कोणकोणत्या थेरपी देतो, त्या कधी आणि का दिल्या जातात आणि त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास करणार आहोत.

पहिली पद्धत म्हणजे सिस्टेमिक फॅमिली थेरपी. या थेरपीमध्ये संपूर्ण कुटुंबाला एका छत्राखालील एक अखंड ‘सिस्टम’ (व्यवस्था) मानले जाते. या सिद्धांतानुसार, कुटुंबातील एका सदस्याच्या वर्तनाचा अथवा समस्येचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. घरातील एक सदस्य चुकला तर त्याचा परिणाम सर्व घरावर पर्यायाने पारस्परातील नातेसंबंधवर होतो. समुपदेशक यात कुटुंबातील संवादाची पद्धत कशी आहे, मुळात कुटुंबात संवाद आहे का? सर्व सदस्यांच्या विचारांची देवाणघेवाण कशी होते? घरातील सगळ्या लोकांचा एकमेकांवर होणारा प्रभाव काय आहे? याचा सखोल अभ्यास केला जातो. समस्या कोणा एका व्यक्तीमुळे नसून सिस्टीममधील दोषांमुळे आहे हे समजून घेऊन एकत्र समस्या सोडवण्यावर यामध्ये भर दिला जातो. घरात कोणत्याही ऐका व्यक्ती मुळे त्रास नसून घरातील पूर्ण सिस्टीम म्हणजे पद्धत चुकीची आहे म्हणून हि पद्धत बदलण्याचा अथवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

दुसरी पद्धत म्हणजे स्ट्रक्चरल फॅमिली थेरपी. प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट रचना, नियम, भूमिका आणि सीमा (Boundaries) असतात. जेव्हा कुटुंबातील ही रचना ढासळते तेव्हा समस्या निर्माण होतात. मुलांनी पालकांच्या भूमिकेत जाणे किंवा पालकांमध्ये सुसंवादाऐवजी दुरावा निर्माण होणे यामुळे वाद निर्माण होतात. स्ट्रक्चरल थेरपीद्वारे कुटुंबातील या सीमा आणि भूमिकांचे पुनर्गठन केले जाते. विशेषतः पालक आणि मुलांमधील नात्यात योग्य तो समतोल आणि आदर प्रस्थापित करण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. आताच्या पिढीला विविध समाज माध्यमातून सहजासहजी सर्व ज्ञान आणि माहिती मिळते आहे, मुलांना स्वातंत्र्य आहे उच्च राहणीमान पालकांकडून पुरवले जाते, मित्रात्वाच्या नात्याने मुलांशी वागले जाते पण त्यामुळे काही ठिकाणी मुलं पालकांना गृहीत धरतात आणि डोक्यावर बसतात आणि पालकांना हे सहन करणं खूप जड जात. ज्या ज्या कुटुंबात जेनरेशन गॅप असतो त्या ठिकाणी हि थेरपी खूप उपयुक्त ठरते.


स्ट्रॅटेजिक फॅमिली थेरपी

ही एक थेट, ध्येयाभिमुख आणि विशिष्ट समस्येवर केंद्रित असणारी पद्धत आहे. यात दीर्घकालीन चर्चेपेक्षा समस्येचे तात्काळ निवारण करण्यावर भर दिला जातो. समुपदेशक या सत्रांमध्ये कुटुंबाला विशिष्ट कृती (Action Plan) किंवा गृहपाठ (Homework and Assignments) देतात. या व्यावहारिक सरावांमुळे संवादातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे सोपे जाते. उदाहरणं
घ्यायचे झाल्यास आपण समुपदेशन करतांना ज्या कुटुंबाना हि थेरपी देवून फायदा झाला आहे त्यातील एक देता येईल. साधारण वर्ष भरपूर्वीच लग्न झालेले पती आणि पत्नी ज्यांच्या कुटुंबात फक्त ते दोघे आणि पतीचे आई वडील असे चारच जण राहत होते. या नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत होती ती हि अगदीच किरकोळ कारणांवरून. चौघे हि एकमेकांच्या चुकांचा पाढा वाचतं होते आणि पत्नी च म्हणणं होत मला आता अजिबात नांदायचे नाहीये मला घटस्फोट घ्यायचा आहे. या कुटुंबासाठी साधारण एक महिना स्ट्रॅटेजिक फॅमिली थेरपी दिली गेलीं आणि आज ते गुण्या गोविंदानें नांदत आहेत.

कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल फॅमिली थेरपी (CBFT) म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे विचार, तिच्या भावना आणि तिचे वर्तन यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. CBFT द्वारे कुटुंबातील सदस्यांचे नकारात्मक विचार आणि गैरसमज शोधून काढले जातात. जेव्हा एखादा सदस्य नकारात्मक विचारसरणी सोडून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतो, तेव्हा त्याचा थेट चांगला परिणाम त्यांच्यातील संवादावर आणि वर्तनावर होतो. एकमेकांबद्दलच्या चुकीच्या धारणा बदलण्यासाठी ही थेरपी उत्तम काम करते. अनेक वाद, भांडणे आणि दुरावे हे फक्त गैरसमज झाल्यामुळे होत असतात त्यातून हे गैरसमज कुटुंबातील लोकांमध्ये असतील तर एकत्र राहणे कठीण होवून जाते. काही कुटुंबात सुखाने राहण्यापेक्षा एकमेकांना हारवण्यात, तुच्छ लेखण्यात, सतत शह आणि काट शह देण्यात मजा येत असते. अश्या घरात सतत एकमेकांना अपमानित करण्याच्या संधी शोधल्या जातात, घरातील लोकांची निंदा केली जाते आणि या घरातील वातावरण कायम तणाव पूर्वक असते. अश्या प्रकारच्या लोकांना कुटुंबाचे महत्व पटवून देवून इतरांबद्दल सकारात्मक विचार करायला लावण्यासाठी हि थेरपी खूप उपयुक्त ठरते.
नेरेटिव्ह थेरपी (Narrative Therapy) हि पद्धती मानते की मुख्य सूत्र म्हणजे “व्यक्ती ही समस्या नाही, तर समस्या ही समस्या आहे.” नेरेटिव्ह थेरपीमध्ये व्यक्तीला तिच्या समस्येपासून वेगळे करून पाहिले जाते. कुटुंबातील सदस्य स्वतःच्या आयुष्यातील संघर्षांकडे एका वेगळ्या आणि तटस्थ दृष्टिकोनातून पाहू लागतात. यामुळे एकमेकांवर दोषारोप करण्याची वृत्ती कमी होते आणि सर्वजण एकत्र येऊन समस्येला एक नवीन, सकारात्मक वळण देतात. अनेक घरात चुकीचं काय आहे हे शोधण्यापेक्षा चुकीचं कोण आहे हे ठरवण्यावर भर दिला जातो. एक छोटस उदाहरणं घ्यायच म्हटले तर समजा घरातील एक स्त्री पोळ्या बनवत असेल आणि त्या व्यवस्थित नाही झाल्या तर सगळे तिला दोष देणार असे सर्वसामान्य चित्र असते. या ठिकाणी प्रथम हे तपासले पाहिजे की यावेळी आपण वेगळाच गहू घेतला का? वेगळ्या दुकानातून घेतला का? गहू दळणाऱ्याने नेहमीप्रमाणे दळला की नाही? अथवा इतर कोणते कारण असू शकेल की पोळ्या बिघडल्या? परंतु अनेकांना इतकं पटकन चुकीचं मत द्यायची अथवा प्रतिक्रिया द्यायची सवय असते की जिने पोळ्या केल्या तिच्यावर खापर फोडून घरातलेच लोकं ते नातं, तो वेळ, तो दिवस पूर्ण खराब करतात.

इमोशनली फोकस्ड थेरपी (EFT) कोणत्याही नात्याचा मुख्य आधार हा भावनिक बंध (Emotional Attachment) असतो. जेव्हा कुटुंबात सुरक्षिततेची आणि भावनिक आधाराची कमतरता भासते, तेव्हा नात्यात दुरावा येतो. हि थेरपी मुख्यत्वे कुटुंबातील सदस्यांमधील हे भावनिक नाते मजबूत करण्यासाठी वापरली जाते. एकमेकांच्या भावनिक गरजा समजून घेणे, एकमेकांना मोकळेपणाने व्यक्त होऊ देणे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. अनेक घरात एकमेकांशी असलेले नाते हे आर्थिक व्यवहार म्हणून, गरजा आहेत म्हणून, समाजात इज्जत जायला नको म्हणून एकत्र राहू या प्रकारचे असते. फक्त कर्तव्य करणे, लग्न केल आहे तर ते निभवावे लागेल, जबाबदारी घेतली आहे म्हणून ती सांभाळने, मुल झालीत म्हणून मोठी करणे, माणुसकी म्हणून मदत करणे पण कुठेही कोणत्याही स्वरूपाचा भावनिक ओलावा नसणे अश्या प्रकारे कुटुंब चालू शकत नाही. अश्या स्वरूपाच्या कुटुंबात प्रत्येक जण स्वतःला असुरक्षित समजतो, कोणीही कोणावर विश्वास ठेवत नाही, मनमोकळे बोलत नाही आणि प्रत्येक जण घुसमट सहन करून स्वतःच्या नशिबाला दोष देत असतो याठिकाणी प्रत्येकाच्या भावनांवर काम करून त्या नुसार थेरपी दिली जाते. अजून एक महत्वाची पद्धती म्हणजे सोल्यूशन-फोकस्ड ब्रीफ थेरपी (SFBT)
अनेकदा कुटुंब भूतकाळातील चुका आणि समस्येची कारणे यातच अडकून राहते. सोल्यूशन-फोकस्ड थेरपी समस्येच्या कारणांपेक्षा समाधानावर (Solutions) आणि भविष्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. कुटुंबाकडे आधीपासून असलेले सकारात्मक गुण, जुने यश आणि कौटुंबिक संसाधने यांचा वापर करून उद्दिष्टे निश्चित केली जातात आणि कमीत कमी वेळेत सकारात्मक मार्ग शोधला जातो. अनेक घरात आपण हे केले असते तर, ते नसते केले तर, आपल्या आई वडिलांनी असा निर्णय घेतला नसता तर अथवा आपणच चुकलो का असा विचार घरातील प्रत्येक जण करत असतो. सतत स्वतःला आणि इतरांना भूतकाळातील निर्णय, चुका, वाईट घटना यासाठी कोसत राहतो आणि आज वर्तमानात काय सुखं समाधान शांती उपलब्ध आहे किंवा आजपासून यापूर्वी झालेल्या चुका कश्या सुधारता येतील याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असतो. आता आपल्या हातात काय आहे यावर लक्ष केंद्रित करून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी हि थेरपी खूप उपयुक्त ठरते.

थोडक्यात सांगायचे तर, कौटुंबिक समुपदेशन हे केवळ वाद मिटवण्याचे साधन नसून ते कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणणारे, संवादाची योग्य दिशा दाखवणारे आणि नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा विणणारे एक शास्त्रशुद्ध माध्यम आहे. वरील सर्व थेरपी च्या माध्यमातून, सर्व थेरपींचा योग्य मेळ घालून प्रत्येक कुटुंबाला आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यास मार्गदर्शन करणे आज काळाची गरज आहे.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे

Comments are closed.