NGN News
Latest Marathi News

१०० एकरात जंगल साकारताना काय संकट येतात ? ( वन दिन विशेष )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक देवराई मानव निर्मित जंगल. नाशिक देवराई मृत जंगल जिवंत करणे या संकल्पनेने ह्या गिरीपुष्प(ग्लीरीसीडिया) सारख्या परदेशी वृक्ष प्रजातीने आच्छादलेल्या परिसरात, आज दहा वर्षां नंतर चांगल्या प्रकारे जैवविविधता सक्षम असलेलं जंगल उभे राहत आहे, अजूनही ह्या जंगलाचा संपूर्ण भाग परिपूर्ण होण्यास पाच एक वर्ष लागतील. जागतिक वन दिनानिमित्त नेमकं कशाप्रकारे आपण हे करू शकलो आणि ते करत असतांना किती संकटांना आज पर्यंत तोंड द्यावं लागलं, हे आपण बघितल्यास नक्कीच लक्षात येईल की आपल्या अवतीभोवती दिसणारे, आपल्याला कुठलेही श्रम न करता मिळालेले छोटे मोठे जंगल यांचे किती महत्त्व आहे आणि किती आत्मीयतेने त्यांचा सांभाळ झाला पाहिजे यावर प्रबोधन होण्यासाठी लेखन.

आज जे नाशिक देवराई आणि नाशिक वनराई सारखे मानवनिर्मित वन ज्यावेळेस उभे राहतात ते करत असताना किती संकटांना तोंड द्यावे लागते, कुठले कुठले अनअपेक्षित संकट समोर येतात व त्यावर आपण कशी मात केली त्या विषयी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न.

५ जुन २०१५ ला आपण, वनमहोत्सव अंतर्गत ,लोकसहभागातून वन विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ११००० रोपांची साधारण चाळीस एकर मध्ये लागवड केली. त्या कार्यक्रमानंतर पुढे त्याचे संगोपन करण्यासाठी कोणी येवो ना येवो आपण त्या रोपांचे तिन वर्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली होती.
त्यानंतर विविध, मानवी व नैसर्गिक संकटांना तोंड देत, दर शनिवारी व रविवारी तर कधी गरज पडल्यास इतर दिवशी जाऊन देवराईत काम सुरू ठेवले ते कसे ते पुढे…….

खरंतर मुळ संकट हे होत की गिरीपुष्प वृक्षांनी आच्छादलेल्या एव्हढ्या मोठ्या परीसरात, ह्या वृक्षाच्या एकसुरी लागवडी मुळे तेथील जमीनीचा पोत बिघडलेला, अश्या परीसरात देशी प्रजातीची रोप लागवड करून संवर्धन करायचं. त्याच वर्षी म्हणजे २०१५ जुन मध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाला त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने जुलै अखेरीस व ऑगस्ट मध्ये रोपांना पाणी देण्याची वेळ आली. ह्या दरम्यान येवढ्या मोठ्या परीसरात, त्या परीसराला संरक्षण मिळाल्याने, त्या परिसरात होणारी वहीवाट थांबल्याने तेथे चांगल्याप्रकारे गवत वाढले, ते‌ वाढलेलं गवत कसं नियंत्रण करायचे ?, त्यासाठी मी माझ्या वर्कशॉपमध्ये गवत कापण्याच्या पट्ट्या तयार करून, त्याचा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी हाॅकी स्टिक सारखा वापर करून काही भागातले गवत नियंत्रण केल. त्यावर्षी पाऊस कमी झाल्याने, ऑक्टोबर मध्येच उर्वरित वाळलेल गवत नियंत्रण करण्या बरोबरच रोपांना पाणी देण्यास सुरुवात केली.

जानेवारीपासून गिरीपुष्प या वृक्षाला फुल येऊ लागतात, त्या काळात त्यातून चिकट द्रव हा खाली जमिनीवर पडत असतो. त्यामुळे त्या भागात लावलेल्या रोपांवर पडून त्या रोपांच्या शेंड्यावर, पानावर, एक चिकट आवरण तयार होत होते. त्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. दुसरी बाब म्हणजे त्याकाळात प्रचंड प्रमाणात बारीक काळी कीड तयार होऊन, जमीनीवर रांगताना दिसून येत. ज्या काही पाणी देण्यासाठी नळ्या विविध पॉईंटला लावलेल्या होत्या, त्या नळ्या पूर्णपणे त्या किडींनी भरगच्च भरलेला असायच्या, त्या पुर्ण नळ्यांवर ती कीड वळवळताना दिसून यायची. काम करतांना त्या नळ्या झटकून, घ्यावा लागत. त्याच बरोबर मावा हि किड अवतीभवती उडत असे. ह्या मुळे तहान लागल्यावर पाणी पितांना हाताने तोंड झाकून पाणी प्यावे लागे. ह्या काळात म्हणजे जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत प्रत्येक(११०००) रोप दर आठवड्याला पुर्णपणे धुऊन काढावे लागायचे. हा प्रकार सुरूवातीचे तीन वर्ष, गिरीपुष्पाच्या फुलण्याच्या काळात करावा लागला. त्यानंतर ज्या भागात रोप छान वाढलेत, त्या भागात गिरीपुष्पाचे नियंत्रण करण्यात आले.

नित्य नियमाने श्रमदान सुरू असताना, शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१६, रोजी, माझ्या सहकारी सुजाताताई काळे, यांचा मुलगा ईशान याला घोणस दंश झाला. त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. वेळीच उपचार मिळाला कारणाने परिस्थिती आटोक्यात राहिली.

२०१६ च्या पावसाळ्यामध्ये देवराई परिसरात गवत पण चांगल्या प्रकारे वाढले होते, त्यामुळे काही गुराखी आपली गुर काही ठिकाणी कंपाऊंड तोडून आत मध्ये घालून देत व स्वतः लपून बसत. असे प्रकार हे वेळोवेळी होत होते. म्हशींनी आपल डोकं घासण्यासाठी वापर केल्यामुळे काही वाढलेल्या रोपांच नुकसान होत होते. कधी नळी मध्ये त्यांचे पाय आडकून पाण्यासाठी काढलेले पॉईंट तुटायचे. आधीच आर्थिक संकट त्यात हा खर्चाचा भार पडायचा.‌ त्यावर पण वेळोवेळी उपायोजना करून गुराख्यांना अटोक्यात आणले.एक विक्षिप्त गुराखी होता. त्याच्या गुरांना हाकलून देत असल्याकारणाने, तो त्याचा राग म्हणून कधी पाईप कापून टाकने, नळ्यांचे पॉईंट तोडणे, तर कधी चांगले वाढलेले रोप तोडून टाकने, असा त्रास देत. त्याला मग चांगल्या पद्धतीने दम दिल्यानंतर हा प्रकार थांबला.

देवराईच्या मागच्या भागात निवांतपणा असल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पार्ट्या होत, तेथे पत्त्यांचे डाव खेळले जायचे. त्यांना वेळोवेळी त्यांना समजावुन, तर कधी पोलीस रेड टाकून तेथुन काढण्याचे काम करावे लागले.

सुरक्षित व निवांत जागा झाल्याकारणाने २०१७ मध्ये असं जाणवलं की इथे सशांची संख्या काही प्रमाणात वाढली, त्याचा परिणाम म्हणजे आपण संगोपन केलेल्या बऱ्याचशा चांगल्या रोपांना ससे कुरतडून, वरचे शेंडे काढून टाकात होते, त्यांची शेंडे काढून टाकण्याची पद्धत अशी होती की असं वाटायचं कोणीतरी मुद्दामून कात्रीने, किंवा धारदार अवजाराने कापून बाजूला ठेवत आहे की काय. कारण ते शेंडे तसेच रोपाच्या बाजूलाच पडलेले असायचे, एक पण पान खाल्लेल नसायचं. काही दिवसांनी लक्षात आलं हे सशांचं काम आहे. हतबल होतो कस ह्यांना आटोक्यात आणायचं सुचत नव्हते. ते कमी म्हणून की काय काही रोपांना वेगवेगळ्या प्रकारच्या बोरर किड्यांचा उच्छाद सुरू झाला. चांगल्या वाढीस लागलेल्या रोपांची खोडांवरची काही भागातली साल, पूर्ण गोलाकार फिरुन खात होते तर काही रोपांना छिद्र पाडून त्यांच्या खोडांमध्ये शिरले होते. गोल खोडावरची साल खाणाऱ्या किड्यांविषयी शेती तज्ञांना दाखवून बघीतले, त्यांना पण त्याविषयी माहिती नव्हती. शेवटी बरेच प्रयोगांती मी देशी दारूचा त्यावर फवारणी साठी उपयोग केला. त्यामुळे बऱ्यापैकी या गोष्टी आटोक्यात आणता आल्या. वनवा लागण्याचे प्रकार बराच वेळा झालेत. पण आपण ग्रास कटरच्या साह्याने वेळच्या वेळी गवत नियंत्रण ठेवत असल्या कारणाने. वनवे आटोक्यात आणण्यास यश मिळाले, त्यामुळे जास्त काही नुकसान झाले नाही.

देवराई च्या संरक्षणासाठी दोन सुरक्षारक्षक आपण ठेवले आहेत. देवराई आणि वनराई मिळून आपल्याला साधारण ९० हजार महिना खर्च आहे. याला कुठल्याही प्रकारची शासकीय किंवा राजकीय आर्थिक मदत नाही, केवळ लोकसहभागातून होतो. कधी कधी अपुऱ्या देणगीमुळे ‌मध्येच आर्थिक संकट उभ राहायचे. अश्या वेळी देवदुता प्रमाणे देणगीदार पाठीशी उभे राहिलेत.
श्रमदानाच्या बाबतीत लोकांना असं वाटायचं की खूप लोक श्रमदानाला येतात, पण असं काही नव्हतं.

सुरुवातीला पंधरा-सोळा स्वयंसेवक मदतीला येत होते. कोणी दोन तास, तीन तास आपआपल्या परीने येत होते. त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे हळूहळू स्वयंसेवकांची संख्या पंधरा सोळा वरुण कमी होत दोन तीन वर, नंतर मी आणि दोन सुरक्षारक्षक आम्ही तिघच काम करत. मधुन मधुन नवीन एक दोन स्वयंसेवक येत. पण त्यांचा उत्साह तेवढ्या पुरताच असायचा. पण एप्रिल २०२५ पासून कृषी विद्याशाखेचे दोन विद्यार्थी नित्यनेमाने श्रमदानाला येत आहेत.

२०२० पासून बिबट्याने आपल वास्तव्य दाखवण्यास सुरुवात केली. मनात भीती ठेवूनच श्रमदान सुरू होते. त्यात बिबट्याची संख्या वाढली एकाचे तीन झाले. चार-पाच वेळा असा प्रसंग आला की देवराईच्या काही भागात श्रमदान करायला जातांना, गवतात बसलेला तो आमच्यावर गुरगुरायचा. त्यावेळी आम्ही तेथून बजुला निघून जाऊन, दुसऱ्या भागात काम करत. तर कधी तो उठून बाजूला निघून गेला आहे. नंतर त्याच्या अस्तित्वाची सवय असल्यासारखे झाले. तरस ने पण आपले वास्तव्य दाखवण्यास सुरुवात केली आता ते जोडी ने आहेत. सापांच्या संख्येमध्ये वाढ झाली त्यात चार चार पाच पाच फुटाच्या घोणस वास्तव वाढलं. नाग, धामण, श्रमदान करतांना कधी अचानक पायाजवळ कधी गवतातुन रोप मोकळे करतांना घोणस हातात जवळ असे बरेच प्रसंग आलेत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पेहराव करून घेतला. त्याच बरोबर ससे आधुन मधुन रोप कुरतडण्या चे काम करतच होते.

पावसाळ्यात गिरीपुष्पा चे वृक्ष उन्मळून पडतात, त्या खाली आपले रोप दाबली जातात, त्यांना वेळीच मोकळ करावे लागते.
काही भागातले कंपाउंड चे अँगलच काही नशेबाज मंडळींनी चोरून नेले. अशा वेळेस गिरीपुष्प वृक्षांच्या फांद्याचे खांब उभे करून जाळीला आधार देण्याचे काम मधूनमधून करावे लागत. अशाप्रकारे अकरा वर्ष पूर्ण होत आले. नाशिक देवराई साधारण १०० एकर परिसर बऱ्यापैकी जंगलात रुपांतर झाले.

ऑगस्ट २०२५ मध्ये साळींदराचे काटे सापडले. त्यावेळेस खूप आनंद झाला की साळींदर सारखा प्राणी आपल्या देवराईत आला. पावसाळा संपला आणि जस ऊन पडायला लागलं. आता सर्व सुरळीत आहे असं वाटत असतानाच, डिसेंबर नंतर काही नवीन लावलेल्या रोपांना पाणी देत असताना, काही रोप बुडापासून तोडून बाजूला फेकलेले व त्या झाडांचे मूळ खाण्यासाठी तिथे खोलवर एक ते दीड फुटाचे खोल खड्डे बघायला मिळाले. आणि साळींदरच्या रूपाने एक नवीन भयंकर संकट समोर उभे राहिले आहे. त्याने दोन महिन्यात साधारण ३५० पेक्षा जास्त रोपांच नुकसान केले. चांगल्या वाढलेल्या, पिवळाकरमळ सारख्या दुर्मिळ प्रजाती , विविध प्रकारचे आंब्याची रोपे होती त्यांच नुकसान केले. सध्या त्याच्या या उपद्रवीपणाला आटोक्यात आणण्याचे काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अशा प्रकारे आपली नाशिक देवराई विविध संकटांना(तरी काही संकट इथे नमूद करु शकत नाही म्हणून केले नाहीत) सामोरे जात आज चांगल्या प्रकारे ३५००० च्या वर्ती विविध प्रकारच्या वृक्ष, वेली, बांबू व झुडपाच्या प्रजातीच्या वाढीमुळे परीपुर्ण जंगलात रूपांतर होत आहे.

महत्वाचे :– त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, आपल्या अवतीभवती असलेले छोटे-मोठे जंगल जपा. पुन्हा निर्माण करणं सोपं नाही.

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
शेखर गायकवाड,
आपलं पर्यावरण संस्था, नाशिक.
९४२२२६७८०१ / ९१३०२५७८०१

Comments are closed.