NGN News
Latest Marathi News

यंदा प्रथमच चवदार ‘हापूस’ची लासलगावमार्गे न्यूयॉर्कला परदेशवारी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) कृषक विकिरण केंद्रातून यंदा प्रथमच चवदार हापूस आंब्याची थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निर्यात करण्यात आली आहे. मंगळवारी (७ एप्रिल) ११०० बॉक्समधील सुमारे ४ टन हापूस व केशर आंबा विकिरण प्रक्रिया पूर्ण करून रवाना करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली

अमेरिकेच्या मान्यतेसाठी आवश्यक तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. अमेरिकेकडून आलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लासलगाव येथील केंद्राची पाहणी करून आंबा निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिल्यानंतर ही निर्यात शक्य झाली. त्यामुळे यंदाच्या हंगामाला सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे.

या केंद्रात २००२ ते २००६ दरम्यान केवळ कांद्याचे विकिरण केले जात होते. २००७ पासून आंब्यावरही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला BARC आणि पणन मंडळाकडे असलेला प्रकल्प नंतर खासगी कंपन्यांकडे गेला. सध्या हिंदुस्थान अॅग्रो लिमिटेड ही कंपनी हा प्रकल्प चालवत आहे. मागील वर्षी आवश्यक प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आंबा निर्यात होऊ शकली नव्हती.

यंदा मात्र कोकणातील हापूस आणि गुजरातमधील केशर आंबा लासलगाव येथे आणून त्यावर गॅमा किरणांच्या द्वारे विकिरण करण्यात आले. या प्रक्रियेमुळे आंबा अधिक काळ टिकतो, कोयीतील कीड नष्ट होते आणि चव व ताजेपणा अबाधित राहतो.

लासलगाव केंद्रातून पुढील काही दिवसांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि मलेशिया या देशांकडेही निर्यात होणार आहे. दरवर्षी भारतातून सुमारे ५० हजार टन आंब्याची निर्यात होते, त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. यंदा ३१ जूनपर्यंत सुमारे ३ हजार टन आंबा निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हापूस (अल्फान्सो), केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, लंगडा, चौसा अशा विविध जातींच्या आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. लासलगाव येथील विकिरण केंद्रामुळे या निर्यातीला चालना मिळत असून शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे.

लासलगाव कृषकमधून झालेली आंबा निर्यात

वर्ष – निर्यात (टन)

२००७ – १५७

२००८ – २७५

२००९ – १२२

२०१० – ९६

२०११ – ८५

२०१२ – २१०

२०१३ – २७५

२०१४ – ३२८

२०१५ – ३२८

२०१६ – ५६०

२०१७ – ६००

२०१८ – ५८०

२०१९ – ६८५

२०२० – कोरोना

२०२१ – कोरोना

२०२२ – ३६०

२०२३ – १०००

२०२४.  ११००

२०२५…  निर्यात नाही

Comments are closed.