NGN News
Latest Marathi News

अधिकमास सांगतानिमित्त जनशांती धाम येथे देवता पूजन सोहळा

  • जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे भाविकांना मार्गदर्शन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

ओझर : अमर आढाव

अधिकमास सांगता व सोमवती अमावस्या पर्वकाळाचे औचित्य साधत ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे शेकडो देवी-देवतांचा भव्य पूजन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत हा पूजन सोहळा पार पडला.यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भाविकांना अध्यात्म, श्रद्धा व सत्कर्म,देवपूजा महत्त्व विषद केले.

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख आध्यात्मिक स्थळांपैकी एक महत्त्वपूर्ण धर्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवभूमी जनशांती धाम येथे कठोर तपस्वी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज व भगवान बाणेश्वर महादेव या प्रमुख देवतांसह येथे एकूण ११८ शिवलिंगांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच अष्टविनायक, अष्टलक्ष्मी माता, अष्टमूर्ती शंकर, राधा-कृष्ण, लक्ष्मीनारायण, राम दरबार, विठ्ठल-रुक्मिणी, चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तीपीठ, संत मेळा, नर्मदा माता, नवग्रह देवता,दिशा देवता यांसह शेकडो देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा येथे करण्यात आलेली आहे.
या सर्व देवतांचे अधिकमास निमित्त ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रघोषात विशेष अभिषेक पूजन करण्यात आले. येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या यज्ञाची यावेळी विधीवत पूर्णाहुती करण्यात आली. नित्यनियम विधी, महाआरती व सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना विशेष मार्गदर्शन करत अध्यात्म, श्रद्धा व सत्कर्म,देवपूजा महत्त्व विषद केले. त्यांच्या अमृततुल्य वचनेमुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक उर्जा लाभली.

यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती होती. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.आश्रमिय संत परमेश्वरगिरींजी महाराज,प्रवक्ते विवेकानंद महाराज, हृदयानंद माऊली यांसह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Comments are closed.