NGN News
Latest Marathi News

अशोका बिल्डकॉन सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

  • सीआयडीसीच्या चार तर इपीसी वर्ल्डच्या दोन पुरस्कारांचा समावेश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : रस्ते आणि पूल बांधणी क्षेत्रांत ख्याती प्राप्त केलेल्या अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीने देशाच्या ऊर्जा क्षेत्रात तसेच रेल्वे प्रकल्प बांधणीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. या दोन्ही क्षेत्रांतील अत्त्युत्तम दर्जाच्या प्रकल्प पुर्तीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात येवून कंपनीला तब्बल सहा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये सीआयडीसीच्या राष्ट्रीय विश्वकर्मा श्रेणीतील चार तर इपीसी वर्ल्ड श्रेणीतील दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे. आजवर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अशोका बिल्डकॉनला एकाच सत्रात सहा पुरस्कार प्राप्तीची ही पहिलीच वेळ आहे.

‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर कंपनीने देश-विदेशांत रस्ते आणि पूल बांधणी करून लौकिक प्राप्त केला आहे. व्यवसाय विस्तार धोरणाला अनुसरून कंपनीने २००८ पासून ऊर्जा तर २०१८ पासून रेल्वे क्षेत्रात पाऊल ठेवत कर्तृत्वसिद्धीचा नवा अध्याय गाठला. याच पार्श्वभूमीवर अलीकडे सीआयडीसीच्या राष्ट्रीय विश्वकर्मा पुरस्कारांची घोषणा होवून नवी दिल्लीत त्यांचे वितरण झाले. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या शिरपेचात चार प्रकल्पांसाठी स्वतंत्र पुरस्काररुपी मानाचा तुरा खोवण्यात आला. त्यासाठी एनएफआर आसाम रेल्वे, जम्मू आणि काश्मीर टनेल रेल्वे, एनटीपीसी सौर ऊर्जा आणि ग्राईड रेल्वे या प्रकल्पांची कार्यपूर्ती प्रमाण मानण्यात आली.

इपीसी वर्ल्ड कडूनही सन्मान..

दरम्यान, अशोका बिल्डकॉनच्या दर्जा आणि निर्धारित कालावधीपूर्व कार्यपुर्ती करण्याच्या परंपरेप्रती इपीसी वर्ल्डने देखील सन्मानाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली आहे. इपीसी वर्ल्ड राष्ट्रीय पुरस्कार २०२६ दरम्यान कंपनीला दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेत. उत्तरपूर्व सरहद्द रेल्वेच्या रंगिया आणि तिनसुकिया विभागाचे विद्युतीकरण तसेच ‘इपीसी’च्याच राजस्थानमधील १५० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा पीव्ही प्रकल्पपूर्तीच्या यशस्वी कार्यान्वयनासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

उपरोक्त सर्व सहा पुरस्कारांचा दोन वेगवेगळ्या सोहळ्यात अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीच्या वतीने राजेंद्र बुरड, पी. के. श्रीवास्तव, विवेक केंगे आणि एस. एस. रावत यांनी स्वीकार केला. दरम्यान, कंपनीच्या या यशाबद्दल चेअरमन अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख आणि संचालक मंडळाने संबंधित विभागांतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.