NGN News
Latest Marathi News

बुवाबाज, सामील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यावर कारवाई करा

  • भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून निदर्शने

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : बुवाबाजीला शरण जात राज्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री व वरिष्ठ अधिकारी अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाल्याचे आरोप होत आहेत. अशा आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी व या आमदारांचे राजीनामे घ्यावेत व अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्य वतीने पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वात केली असून या आमदारांच्या राजीनाम्याच्या अधिकाऱ्यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक कार्यालयावर आंदोलन करून निदर्शने करण्यात आले.

निवडून गेलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात. संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता या उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून संविधानाने टाकलेली जबाबदारी पार न पाडणे आहे. अशा लोकप्रतिनिधींच्या निमित्ताने तंत्र-मंत्र, जादू-टोणा इत्यादी अंधश्रद्धेच्या गोष्टींना राजमान्यता मिळत आहे. त्यामुळे सामान्य जनताही अशा भोंदू बाबांच्या भोंदूगिरीला बळी पडत आहेत. तीच परिस्थिती प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. या अधिकाऱ्यांच्या प्रभावाचा वापर असे भोंदू सातत्याने करीत असतात.

भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत तितकेच गुन्हेगार त्यांना समर्थन देणारे, शरण जाणारे व आपल्या अनुयायांना बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे गलिच्छ व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे. असे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटविण्याची कारवाई राज्य सरकारने करावी.

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणा, जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून सदर कायद्याची कठोर अंमलबजावणी करा व सोशल मीडियातून होणाऱ्या बाबा-बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करा, अशी मागणीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

सातपूर येथील एनजीओ (NGO) म्हणून काम करीत असलेला रवींद्र एरंडे याने सुध्दा अशोक खरात सारखेच अनेक महिलांचे शोषण केले आहे.त्याबाबत सखोल चौशी व्हावी. अशी पक्षाच्यावतीने मागणी करण्यात आली.

यावेळी पक्षाच्यावतीने श्रीमती हेमांगी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक नाशिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते व सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड, पक्षाचे जेष्ठ नेते कॉ सिताराम ठोंबरे, अॅड.तानाजी जायभावे, अॅड. वसुधा कराड कॉ दिनेश सातभाई, कॉ सुनील मालुसरे, डॉ. मिलिंद वाघ, कॉ दगडू व्हडगर,कॉ संतोष काकडे, कॉ तुकाराम सोनजे, कॉ.सचिन मालेगांवकर,कॉ.शामला चव्हाण, कॉ विजया टीक्कल, कॉ छाया जाधव, कॉ मोहन जाधव,कॉ.आत्माराम डावरे, कॉ. गौतम कोंगळे, कॉ राहुल गायकवाड,कॉ.युवराज पाटील,कॉ.अरविंद शहापुरे यासह शहरातील नागरिक, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.