
- उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू; नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान दुर्घटना; ११ हून अधिक पोलीस कर्मचारी, भाविक जखमी
नाशिक : सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना भरधाव कारने धडक दिल्याची गंभीर घटना रविवारी ( दि. १८) पहाटे घडली. या अपघातात वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला असून, ११ हून अधिक पोलीस कर्मचारी आणि काही भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. भाविकांची गर्दी आणि वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन नांदुरी परिसरात पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. दरम्यान, वणीच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने अभोणा चौफुली परिसरात नियंत्रण गमावल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आणि काही भाविकांना धडक दिली. या धडकेत अनेक जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. जखमींना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करून गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Comments are closed.