
- डॉ. नीलम गोऱ्हे यांचे देवीचरणी साकडे; रेणुका माता मंदिर सौरऊर्जा प्रकल्पाच्या निधी दिरंगाईबाबत अधिवेशनात भूमिका मांडणार
- राज्यातील इतर गडांवरील देवस्थानांसाठीही रोपवे सुविधेसाठी प्रयत्न करणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांदवड येथील श्री रेणुका माता आणि वणी येथील श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी दुष्काळाचे संकट दूर व्हावे, बळीराजा सुखी व्हावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि महिला व मुलींना सुरक्षित, सन्मानाचे जीवन लाभावे, असे साकडे त्यांनी देवीचरणी घातले.
एल नीनोसारख्या हवामानविषयक घटनांमुळे उद्भवू शकणाऱ्या अवर्षणाच्या संकटापासून राज्याचे व देशाचे रक्षण व्हावे, वेळेवर पुरेसा पाऊस पडावा आणि शेती समृद्ध व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभावे, संकटांचा सामना करण्याचे बळ मिळावे आणि कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महिलांवरील हिंसा व अत्याचार थांबावेत, महिला आणि मुलींना निर्भयपणे जगता यावे, तसेच राज्य व देशात शांतता, सुरक्षितता आणि सलोखा नांदावा, यासाठीही त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले.
श्री रेणुका माता मंदिरातील सौरऊर्जा सुविधेसाठी यापूर्वी निधी दिला होता. मात्र, यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले नसल्याचे उत्तर मिळत आहे. त्यामुळे निधीशी संबंधित पत्रव्यवहार आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटी शोधून, त्या दूर करण्यासाठी व आवश्यक कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
सप्तशृंगगडावरील रोपवे सुविधेच्या धर्तीवर राज्यातील इतर गडांवरील देवस्थानांमध्येही अशा सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक परिस्थिती व आवश्यक बाबींचा विचार करून रोपवे सुविधा उभारल्यास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि अन्य भाविकांना दर्शनासाठी जाणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
दौऱ्यादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था उत्तम असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठीच्या सुविधा, महिला सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या कामाची प्रगती व प्रलंबित बाबींची माहिती घेऊन संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.