NGN News
Latest Marathi News

वाणी समाज महिला आघाडीतर्फे कर्तृत्वदीप सोहळा उत्साहात

  • १६० जणींचा सहभाग; ‘उखाणा क्वीन २०२६’ राज्यस्तरीय स्पर्धेचेही आयोजन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था, महिला आघाडी नाशिक यांच्या वतीने ‘उखाणा क्वीन २०२६’ राज्यस्तरीय स्पर्धा व १६० महिलांचा कर्तृत्वदीप सोहळा नुकताच माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास तब्बल ६०० महिलांची उपस्थिती लाभली.

नाशिक शहर अध्यक्षा चैताली अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्षा प्राजक्ता पाखले, राष्ट्रीय कार्यवाह अंजली पाखले, प्रदेशाध्यक्षा स्मिता खैरनार व महेंद्र शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाशिक शहरातील १२ विभागांच्या कार्यकारिणी सदस्यांना पदभार देण्यात आला. चैताली अमृतकर यांनी आपल्या एक वर्षाच्या कार्याचा आढावा घेत आगामी कार्याची दिशाही स्पष्ट केली.

‘गोदेची हाक’ उपक्रमाची घोषणा

यावेळी चैताली अमृतकर यांनी आगामी ‘गोदेची हाक’ या उपक्रमाची घोषणा केली. गोदावरीच्या स्वच्छता व निर्मळतेसाठी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उखाणा क्वीनची अंतिम फेरी

वटपौर्णिमेच्या निमित्ताने नाशिकच्या १२ विभागांसह महाराष्ट्रातून निवड झालेल्या २४ विजेत्यांमध्ये उखाणा क्वीनची अंतिम फेरी घेण्यात आली. सुनंदाताई पाटील, रंजना बोरा व अलकाताई दराडे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. विविध समित्यांमध्ये १२ विभागांच्या सुमारे १६० कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडत कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम – अनिता कोठावदे. द्वितीय– शीतल बागड तृतीय – केतकी कोठावदे उत्तेजनार्थ : सोनाली सोनजे आणि अंकिता मालपुरे
विशेष प्रविण्य– छाया कोठावदे

Comments are closed.