NGN News
Latest Marathi News

एसएसके पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती निर्मिती कार्यशाळा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

वडझिरे : धनलक्ष्मी शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या छोट्या हातांनी, निरागस मनाने आणि अफाट सर्जनशीलतेने सुंदर गणपती मूर्ती साकारल्या. प्रेम, भक्तिभाव आणि कलात्मकतेचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक व पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.

एस.एस.के. पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण, सर्जनशील आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांमधील कलागुण, कल्पकता, आत्मविश्वास आणि पर्यावरणाविषयीची जाणीव विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमासाठी धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, संचालिका सौ. उज्ज्वला कातकाडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका सौ. सुजाता नंद, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

Comments are closed.