
- माजी प्रमुख सचिव व कार्यवाह श्रीकांत बेणी यांची पोलिसांत तक्रार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या कारभारातील कथित आर्थिक गैरव्यवहार, पुरावे दडपणे आणि संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी आजी-माजी विश्वस्त व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे माजी प्रमुख सचिव व कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्त तसेच भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, २०१२ ते २०१७ या कालावधीत संस्थेच्या नूतनीकरणाच्या विविध कामांमध्ये निविदा प्रक्रियेचे पालन न करणे, मुदत ठेवी मोडणे आणि कामांच्या बिलांमध्ये अनियमितता आदी प्रकार झाल्याचा आरोप आहे. शासनमान्य मूल्यनिर्धारक व वास्तूविशारद यांच्या अहवालानुसार संस्थेचे १५ लाख ७९ हजार ५०२ रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या नुकसानीच्या वसुलीसाठी २०१९ मध्ये धर्मादाय उपायुक्तांकडे दावा दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित प्रकरणातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत. परिणामी, पुराव्यांअभावी वसुलीचा दावा नामंजूर झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संस्थेचे आर्थिक हित जपण्याऐवजी पुरावे दडपून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करत संबंधित आजी-माजी विश्वस्त व त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे व कटकारस्थानासह लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. बेणी यांनी केली आहे.
@ सार्वजनिक जीवनात कोणी स्वच्छ काम करू शकतो ह्यावर बेणींचा स्वानुभवामुळे विश्वासच बसत नाही. त्यामुळे त्यांनी अनेक पद्धतीने आम्हाला बदनाम करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. इतके करूनही न्यायालयाने आमची प्रतिमा स्वच्छ ठरवली; याचा प्रचंड त्रास श्रीकांत बेणी यांना झाला आहे. त्याच नैराश्यापोटी त्यांनी पुन्हा तेच तेच करणे सुरू ठेवले आहे. लवकरात लवकर त्यांनी आपली प्रकृती चांगल्या डॉक्टरांना दाखवावी हीच गणराया चरणी प्रार्थना.
- मिलिंद जहागीरदार, माजी विश्वस्त
दरम्यान, बेणी यांच्या या मागणीसंदर्भात ‘सावाना’च्या विद्यमान विश्वस्तांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला गेला.
Comments are closed.