NGN News
Latest Marathi News

पंचाहत्तरी संकोचली ! ना देवाभाऊ, ना गिरीशभाऊ, ना गुलाबभाऊ..( प्रासंगिक/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

कधीकाळी महाराष्ट्र भाजपचा एकहाती डोलारा सांभाळणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला हितचिंतकांची भरभरून गर्दी जमली असली तरी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील एकही मंत्री तिकडे फिरकला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खडसेंच्या पक्षातील इतर बड्या नेत्यांनी सोहळ्याला उपस्थित राहून सोपस्कार पूर्ण केले. वस्तुतः, राजकीय मुल्ये आणि सर्वसमावेशकता यांसाठी जाणल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला. जळगावमधील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे या मंत्रीत्रयीनेही सोहळ्याकडे पाठ फिरवली.

केवळ खानदेशच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात भाजपला उभे करण्यात खडसे यांनी दिलेले योगदान खासगीत अगदी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेदेखील नाकारू शकत नाही. अगदी, नितीन गडकरी, पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही ती बाब मान्य केली आहे. तथापि, मोदी-शहांच्या पोलादी राजवटीच्या चौकटीत ‘अनफिट’ म्हणून शिक्का बसलेल्या नाथाभाऊ यांची देवेंद्रपर्वात हेळसांड झाली. कथित भ्रष्टाचार प्रकरण मालिकेत स्वत:सह कुटुंबियांचे नाव आल्याने नाथाभाऊ आधी मंत्रिमंडळातून पायउतार झाले आणि कालौघात त्यांच्यावर पक्ष सोडण्याची नामुष्की आली. नंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सहारा घेतला. तथापि, विधान परिषदेची आमदारकी वगळता त्यांचा प्रवास राजकीयदृष्ट्या मर्यादित राहिला. स्नुषा रक्षा खडसे यांची लोकसभेतील ‘हॅटट्रिक’ आणि अलीकडील केंद्रीय राज्यमंत्रीपद हा त्यांच्या भाजपनिष्ठेचा भाग असला तरी नाथाभाऊ यांच्या नाकावर टिच्चून त्यांना तो अभ्युदय अनुभवता आलाय.

अगदी २०१४ पर्यंत नाथाभाऊ आणि खानदेश या एकाच नाण्याच्या दोन बाजू राहिल्यात. विशेषतः, जळगाव जिल्ह्यात भाजपचे त्यांच्याविना पानही हलेना, अशी स्थिती होती. सहा वेळा आमदार, दोनदा कॅबिनेट मंत्रिपद, विरोधी पक्षनेता अशी त्यांची भरभक्कम वाटचाल राहिली. सुरेशदादा जैन, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांसह अनेक दिग्गज नाथाभाऊ यांच्या शब्दांपलीकडे नव्हते. पुढे मात्र त्यांचा उलट राजकीय प्रवास सुरु झाला तो आजतागायत. कन्या रोहिणी यांना राजकारणात खास जम बसवता आला नाही. मुक्ताईनगरमध्येच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वाटेला दोनदा पराजय पदरी पडला. सुरेशदादा यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यावर जळगावच्या राजकारणाची सूत्रे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्याकडे आलीत. शेवटी राजकारणात उगवत्या सूर्याला नमन करण्याचा प्रघात रूढ झालाय. नाथाभाऊ त्याच वहिवाटीवरचे वाटसरू ठरलेत म्हणायचे.

थोडक्यात, राजकारणात कोणाचीही चलती फार काळ चालत नाही. कोणीतरी ‘गॉडफादर’ असल्याविना ही वहिवाट सुखकर होत नाही. तत्वाधीष्ठीत राजकारण तर औषधाला देखील शिल्लक राहिलेले नाही. भाजपमध्ये तर ती संकल्पनाच कालबाह्य झालीय. नितीन गडकरी, पूनम महाजन यांसारख्या नेत्यांच्या वाटेला जे आले, त्याच प्रकारचे चटके नाथाभाऊ यांना बसले. आज त्यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा संकोचण्याचे कारणही यापेक्षा वेगळे नाही. वार्धक्य आणि आजारपण यामुळे राजकारणातून बऱ्यापैकी बाजूला गेलेल्या नाथाभाऊ यांचा राजकीय चढ-उतार समजण्याजोगा असला तरी नव्वदीच्या दशकापासून तब्बल दोन दशके भाजपला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळवून देण्यात त्यांनी दिलेले योगदान तमाम भाजपेयींना मान्यच करावे लागेल.

Comments are closed.