NGN News
Latest Marathi News

नाशिक महापालिकेच्या श्वेतपत्रिकेवर शिवसेना उबाठाला आक्षेप

  • पंचनामा करण्याची तयारी; खा. संजय राऊत आणि आ. अनिल परब येणार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महापालिकेच्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा शिवसेना उबाठा पक्षाला संशय असून नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेचा पंचनामा करण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्या चार वर्षांतील निविदा प्रक्रिया, जमा-खर्च आणि विकासकामांचा लेखाजोखा श्वेतपत्रिकेत मांडण्यात आला आहे. तिचे तज्ञांकडून लेखापरीक्षण करून त्यामधील गैरव्यवहार जनतेसमोर आणण्याचा पक्षाने चंग बांधला आहे.

२०२२ ते २००२६ या चार वर्षांतील महापालिकेचा प्रशासकीय काळ अनेक आरोपांनी गाजला होता. त्या अनुषंगाने प्रशासंच्या वतीने नुकतीच श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. मात्र, त्यामधील आर्थिक मुद्द्यांवर शिवसेना उबाठा गटाला आक्षेप आहे. पक्षाच्या मते, या काळात मोठ्या आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाले आहेत. हि बाब लक्षात घेता पक्षातर्फे श्वेतपत्रिका तज्ञ विधिज्ञ आणि सनदी लेखापाल यांच्या चमुकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून अंतिम अहवाल आल्यानंतर योग्य त्या त्रुटी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी संपर्कनेते खा. संजय राऊत आणि आ. अनिल परब हे नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

खा. राऊत आढाव्यासाठी येणार

दरम्यान, नाशिकचे रस्ते आणि खड्डे यांविरोधात शिवसेना उबाठा पक्षाने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहता प्रशासन त्यावर नेमकी काय भूमिका घेतेय, यावर पक्ष, विशेषतः खा. संजय राऊत हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि पक्षाचे महापालिका गटनेते यांच्या ते सातत्याने संपर्क ठेवून आहेत. या कामात नेमकी काय प्रगती झाली, याचा आढावा घेण्यासाठी खा. राऊत पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

Comments are closed.