NGN News
Latest Marathi News

नाशिकमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य; शहरवासियांमध्ये संतप्त भावना

  • खड्ड्यांनी घेतले चौघांचे बळी; महापालिका प्रशासनाविरोधात मोठा रोष
  • सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक; जनांदोलन तीव्र होण्याचे चिन्हे

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या निमित्ताने झालेल्या सार्वत्रिक खोदकामाला विक्रमी पावसाची जोड लाभल्याने नाशिक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांनी चौघांचे बळी घेतले असून सुस्त प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याची संतप्त भावना शहरवासियांमध्ये उमटत आहे. प्रशासकीय राजवट जाऊन लोकप्रतिनिधी कारभार हाकत असतानाही परिस्थितीत बदल होत नसल्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधकांत असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये विकासकामे सुरु आहेत. परिणामी अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे नागरिक आणि वाहनधारक यांची प्रचंड कुचंबना होत आहे. भरीस भर या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनी आजवर चौघांचा बळी घेतला आहे. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. गुरुवारी महापलिका मुख्यालयात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना उबाठा पक्षाने अपघाती मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांसह आंदोलन करीत घोषणाबाजी केली. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही प्रशासनाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस( अजित पवार ) गटाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी शहरातील काही चौकांमध्ये जनआंदोलन करीत स्वाक्षरी मोहीम राबवली. भाजपच्या अनेक नगरसेवकांना देखील प्रशासनाचा निष्काळजीपणा संतापजनक वाटत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जनांदोलन तीव्र होण्याचे चिन्हे आहेत.

प्रशासनाचा अजब दावा..

दरम्यान, नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांच्या प्रक्रियेत निर्माण झालेले खड्डे बुजवण्यात आले आहेत. पावसामुळे काही ठिकाणचे डांबर निघून गेल्याने अपघात होत असल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. स्टार रेटच्या मुद्द्यामुळे टेंडर काढूनही खड्डे बुजवले गेलेले नाहीत. सध्या ते ठेकेदारांकडून बुजवून घेतले जात आहेत, असा खुलासाही करण्यात आला आहे. अनेक ठेकेदारांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत तर आजवर दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले आहे.

गय करणार नाही : महाजन

नाशिकमध्ये खड्ड्यात पडून एका उद्योजकाचा मृत्यू झाला आहे, त्या संदर्भात घटनेची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. यासंदर्भात आपण घटनेची माहिती आयुक्त व महापौर यांच्याकडून घेतली आहे तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करणार आहोत. मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्याची गय ठिकाणी केली जाणार नाही, असा इशाराही महाजन यांनी दिला आहे.

‘आयमा’कडून सुरक्षित उपाययोजनांची मागणी

वाहतूक कोंडी, जीवघेणे खड्डे आणि नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थेमुळे अक्षरशः ‘ मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एका व्यावसायिकाला प्राण गमवावे लागल्याने औद्योगिक क्षेत्रात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन, ट्राफिक प्लॅनिंग चे चेअरमन विनोद कुंभार, अविनाश भामरे आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी एक्सलो पॉईंटसह एमआयडीसीतील विविध अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची पाहणी केली. यावेळी वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

Comments are closed.