** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : पालकमंत्री असो वा नसो, नाशिकच्या प्रश्नांसाठी आपण कायम उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील रस्ते, कुंभमेळ्याची कामे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. येत्या सहा महिन्यांत नाशिकमधील सर्व प्रमुख विकासकामे पूर्ण करून शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वरसह नाशिकमध्ये मुसळधार पावसाच्या काळात आपण स्वतः उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगत, मी कुठेही कमी पडलो नाही आणि पालकमंत्र्यांची उणीव भासू देणार नाही, असे महाजन म्हणाले.
शहरातील खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. पैशांची किंवा प्रशासकीय परवानगीची चिंता करू नका. आवश्यक त्या परवानग्या तात्काळ दिल्या जातील. कॉलनीतील रस्ते त्वरित दुरुस्त करा आणि खड्डे तातडीने बुजवा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासन सतर्क राहण्याची गरज व्यक्त करत महाजन म्हणाले की, प्रत्येक अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असला पाहिजे. काम सुरू आहे आणि अधिकारी दिसत नाहीत, हे आता चालणार नाही. कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कुंभमेळ्यासाठी अवघे एक वर्ष शिल्लक असल्याने विकासकामांना वेग देण्याचे निर्देश देत त्यांनी सर्व ठेकेदारांची तातडीची बैठक बोलावण्यास सांगितले. ३० ते ३५ टक्के कमी दराने टेंडर घेतल्यावर दर्जेदार कामे कशी होतील? काही टेंडर रद्द करण्याची गरज असल्यास त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळा मंत्री म्हणून संपूर्ण जबाबदारी स्वतःची असल्याचे सांगत महाजन यांनी यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नव्हती, असा दावा केला. नाशिककरांना काही काळ त्रास होणार असल्याची कल्पना आपण आधीच दिली होती, असे सांगत त्यांनी डांबरी रस्त्यांऐवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांवर भर दिला.
सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांमधून नाशिकचा चेहरामोहरा बदलत आहोत. एका रस्त्याखाली सात प्रकारच्या युटिलिटी सुविधा उभारल्या जात आहेत. आधुनिक आणि नव्या नाशिकची निर्मिती सुरू असून, पुढील सहा महिन्यांत ही कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिककर अभिमानाने म्हणतील की, आमच्या शहरासारखे शहर नाही, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत मुरूम टाकू नका, दर्जेदार कामे करा. उद्यापासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
Comments are closed.