NGN News
Latest Marathi News

अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर; आश्रमशाळेतील प्रकाराने खळबळ

  • बाळाला जन्म दिल्याची माहिती; नात्यातील अल्पवयीन मुलाकडून अत्याचार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्याचारानंतर ही विद्यार्थिनी गरोदर राहिली. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही, असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनी जेव्हा सुट्ट्यांवर आपल्या गावी गेलेली होती, त्याच काळात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन आदिवासी अप्पर आयुक्तांनी दिले आहे. या घृणास्पद प्रकारातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Comments are closed.