
- स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त उपक्रम; ६० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा / श्रीकांत रौंदळ
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त सटाणा येथील बागलाण करिअर अकॅडमी (पोलीस, सैनिक व स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र) येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संस्थेच्या परिसरात ६० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.त्यात चिंच,कडुलिंब,जांभुळ, पापडी, प्रामुख्याने झाडे लावण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही संतांची शिकवण आजच्या काळात अधिक महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर पर्यावरणाचे रक्षण होऊन पुढील पिढीसाठी समृद्ध निसर्गाचा वारसा निर्माण होईल.”
बागलाण करिअर अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “स्वामी विवेकानंदांनी युवकांना राष्ट्रसेवा, चारित्र्य, शिस्त आणि समाजसेवेचा संदेश दिला. त्याच विचारांचा वारसा जपत बागलाण करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पोलीस व सैनिक भरतीचे प्रशिक्षणच नव्हे, तर सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार दिले जातात. आज लावलेले प्रत्येक रोप भविष्यात हजारो लोकांना शुद्ध हवा, सावली आणि जीवन देणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी.”
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पवार माजी सैनिक देविदास निकम आर्यन सोनवणे श्लोक घोडे तसेच बागलाण करिअर अकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments are closed.