NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ पदग्रहण सोहळा उत्साहात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा पदग्रहण समारंभ शनिवारी (दि. ४ जुलै) उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऑगस्टीन पिंटो, संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यास सेजल सोनवणे, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. श्रुती कोठारी, डॉ. स्नेहल ठमके, रेव्हरंड पास्टर मधुकर अडबाले आणि आनंद विश्वकर्मा हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर बायबलमधील वचन पठण, प्रार्थनागीते तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने निवडलेल्या प्रतिनिधींना पद व गोपनीयतेची शपथ देऊन पदभार सुपूर्द करण्यात आला. अध्यक्षपदी ओजस्वी पटकरी, उपाध्यक्षपदी अंगद साळवे, पंतप्रधानपदी ध्रुव रोकडे, उपपंतप्रधानपदी शर्वरी शिंदे, स्पीकरपदी श्रावणी ओझरकर, डेप्युटी स्पीकरपदी रुद्र वाघ, विरोधी पक्षनेतेपदी शिवराज कुंटे आणि उपविरोधी पक्षनेतेपदी समीक्षा चव्हाण यांची निवड झाली.

प्राथमिक विभागाच्या हेड बॉयपदी माहीर दोंदे, हेड गर्लपदी अनामिका यादव, तर पूर्वप्राथमिक विभागाच्या हेड बॉयपदी वंश वडनेरे आणि हेड गर्लपदी ईशान्वी सोनावणे यांची निवड करण्यात आली.

यावेळी आनंद विश्वकर्मा यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अशा लोकशाहीप्रधान उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. अतिथींनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देत शाळेच्या प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. रेव्हरंड मधुकर अडबाले यांनी शाळेच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना केली.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभागप्रमुख भाग्यश्री मराठे, शीतल चिंचोलीकर तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.