
** एनजीएन न्यूज नेटवर्क
इंग्लिशमध्ये मधला माकड होणे या संकल्पनेला Monkey in the middle” किंवा “Caught in the middle” (मध्ये अडकणे) असे म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अस मधलं माकड बनतो आणि नंतर त्यातून खूप मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा खूप चांगल्या हेतूने, योग्य उद्देश समोर ठेवून आपण आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी अथवा इतर नातेसंबंध मध्ये काहीतरी सांगायला, बोलायला, सल्ला द्यायला अथवा काही चांगल करायला जातो पण त्याचा परिणाम आपल्याला हवा तसा सकारात्मक नं होता आपल्या बद्दल असलेल्या इतरांच्या चुकीच्या कल्पना, विचार आणि गैरसमज यातून भलताच होतो.
जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन गटांमधील वाद, अनेक व्यक्तींशी निगडित असलेला घरगुती कोणताही प्रश्न, अडचण, कुटुंबातील, कार्यालयातील, सामाजिक असे काही प्रश्न आपण सोडवायला किंवा चर्चा करायला जातो त्यावेळी आपल्याला हा अनुभव नक्कीच येतो. बहुतेक वेळा संवादामध्ये एखादी तिसरी व्यक्ती नको असतानाही मध्ये ओढली जाते, तेव्हा त्या तिसऱ्या व्यक्तीची जी कोंडी होते, त्याला ‘मधला माकड होणे’ असे म्हणतात. हे लहान मुलांच्या ‘मंकी इन द मिडल’ या खेळावरून आले आहे, जिथे दोन मुले एकमेकांकडे चेंडू फेकतात आणि मधल्या मुलाला तो चेंडू पकडायचा असतो पण तो सहसा त्याच्या हाताला लागत नाही आणि तो फक्त धावपळ करत राहतो तशी परिस्थिती आपल्या बाबतीत होते.
या संकल्पनेचे सविस्तर मानसशास्त्रीय विश्लेषण (Psychological Analysis) आज आपण या लेखातून करणार आहोत आणि आपल्या रोजच्या आयुष्यात अश्या प्रसंगातून कसे सावध राहायचे यावर उपाययोजना बघणार आहोत.
मधल माकड याला कुटुंब मानसोपचारामध्ये (Family Therapy) या स्थितीला ‘ट्रायंग्युलेशन’
(त्रिकोणीकरण) म्हणतात.
जेव्हा दोन लोकांमध्ये जसे की आई-वडील, दोन मित्र, किंवा बॉस आणि सहकारी, पती पत्नी तणाव निर्माण होतो, तेव्हा ते आपसातील तणाव थेट सोडवण्याऐवजी तिसऱ्या व्यक्तीला त्यात ओढतात.
यामुळे मूळ दोघांमधील तणाव तात्पुरता कमी होतो, पण त्या तिसऱ्या व्यक्तीवर प्रचंड मानसिक दबाव येतो, कोणाचीही बाजू घेतली तरी एकाशी त्याला वाईटपणा घ्यावा लागतो त्यातून नातेसंबंध बिघडतात आणि अधिक गुंता निर्माण होतो.
मधल्या माकडाची मानसशास्त्रीय भूमिका आणि त्याचे प्रकार जर पाहिले, तर
या चक्रात अडकलेली व्यक्ती नकळत पुढील पैकी एका भूमिकेत जाते. मध्यस्थ (The Mediator/Peacemaker) म्हणजे दोन्ही बाजूंनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. यात मध्ये असलेल्या व्यक्तीची स्वतःची मानसिक ऊर्जा कमालीची खर्च होते. दोन्ही कडील लोकांनी आपलं म्हणणं ताणून धरलं असेल आणि त्यांना तडजोड करण्यात काहीच रस नसेल तर उगाच मध्यस्थी करून आपला वेळ श्रम व्यर्थ जातात.
दूत किंवा निरोपवह्या (The Messenger) त्याला सांग की मी त्याच्याशी बोलणार नाही, तिला विचार अस का बोललीस, त्यांना सांगा आम्हाला हे आवडलं नाही असे निरोप शक्यतो नकारात्मक विषया संधर्भात कुठल्यातरी माध्यमातून तिसऱ्या व्यक्ती कडून कळवण्याचा घरात, कार्यालयात नात्यात केला जातो . अशा वेळी तिसऱ्या व्यक्तीला केवळ निरोप पोहोचवण्याचे साधन बनवले जाते, ज्यामुळे गैरसमज वाढतात. तिसऱ्या व्यक्ती कडून एक जरी शब्द इकडचा तिकडे झाला तरी चुकीचे समज पसरतात आणि वादाला तोंड फुटते. तिसरी व्यक्ती दोघांचे सांगणे त्याच्या पूर्व अनुभव, सध्याची परिस्थिती, दोघांचे स्वभाव आणि एकंदरीत सगळं अभ्यासून जरी बोलली तरी इतर दोघे वेळेवर मी अस बोललोच नाही, मी अस सांगितलच नव्हतं म्हणून पलटून पडतात.
कुठेही काही सांगायला, बोलायला किंवा समजवायला गेलं की अनेक व्यक्ती बळीचा बकरा (The Scapegoat) बनतात. या मध्ये जीं मधली व्यक्ती असते तिचा हेतू कितीही स्पष्ट आणि चांगुलपणा चा असला तरी दोन्ही बाजूंचे लोक शेवटी आपल्या चुकांचे खापर त्या मधल्या व्यक्तीवरच फोडतात. अश्या वेळी समोर एखादी गोष्ट चुकीची दिसत असेल तरी आपण शांत राहणे, स्वतःची हुशारी नं वापरता फक्त जे होत आहे ते बघत राहणे शहाणपणाचे ठरते.
मधलं माकड बनणाऱ्या व्यक्ती वर खूप मानसिक आणि भावनिक परिणाम होतात आणि वारंवार असे होत राहिल्यास ती व्यक्ती खूप दुखावली जाते, स्वतःला सतत अपराधी समजू लागते, इतर लोकं पण त्या व्यक्ती पासून विनाकारण चुकीची वागणूक डेत राहतात. हे मधलं माकड आमची काही गुपित इतरांना सांगेल, हे मधलं माकड कायम सगळ्यांना सगळं सांगत असते, सल्ले देत असते अशी प्रतिमा तयार होवून त्या व्यक्ती पासून छोटया छोटया गोष्टी लपवणे असे प्रकार घडतात थोडक्यात ही व्यक्ती सगळ्यांचा विश्वास त्याच्या चांगुलपणा मुळे गमावून बसते आणि माझं काय चुकलं याच उत्तर शोधत राहते.
मधला माकड बनणाऱ्या व्यक्तीला अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते.
भावनिक थकवा (Emotional Burnout) हा त्यातील मुख्य त्रास आहे. काहीही बोललं, कस ही बोललं, कोणा जवळ पण बोललं, नाही बोललं तरी सगळीकडून त्यालाच बदनाम केल जात. याच बरोबर
सतत दुसऱ्यांचे वाद, दुसऱ्यांचे आरोप प्रत्यारोप हाताळल्यामुळे तीव्र मानसिक थकवा येतो.
द्विधा मनःस्थिती (Loyalty Conflicts)होत राहणे हा प्रकार मधल्या माकडा सोबत घडतो. जर दोन्ही बाजूच्या व्यक्ती जवळच्या असतील तर “मी कोणाची बाजू घेऊ?” या विचाराने व्यक्तीला अपराधीपणा (Guilt) बोचत राहतो. अनेकदा या व्यक्तीला माहिती असते कोण चूक कोण बरोबर आहे पण जवळच्या व्यक्तींबाबत असा न्याय निवाडा करणे म्हणजे ऐका साठी तो पूर्ण शत्रु अथवा दुश्मन, विरोधक म्हणून गृहीत धरला जातो. एकत्र कुटुंब, मोठे मित्र मैत्रिणींचे ग्रुप, राजकीय गट, सामुदायिक पद्धतीने काम चालणारी ठिकाणे इथे हा अनुभव प्रत्येकाला येतो.
अँक्झायटी आणि तणाव (Anxiety & Stress) हा अत्यंत भयानक मानसिकते संबंधित आजार मधल्या माकडाला सहन करावा लागतो.
कोणत्याही क्षणी कोणत्याही विषया वरून वाद उफाळून येईल या भीतीने ती व्यक्ती सतत सतर्क आणि चिंतेत राहते. कोण कधी कश्या वरून बिघडेल आणि त्याला जबाबदार धरेल हा तणाव कायम त्याच्या मनावर राहतो.
स्वतःच्या अस्तित्वाची नासाडी हे मधलं माकड करून घेते. दुसऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या नादात व्यक्ती स्वतःच्या गरजा आणि भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. सातत्याने माझे सल्ले कोणीच ऐकले नाहीत, माझ्या बद्दल लोकं नकारात्मक झाले, मी जोडण्याचा प्रयत्न केला पण ते जास्तच बिघडलं, मला, माझ्या सांगण्याला बोलण्याला कोणीच किंमत दिली नाही या विचार चक्रातून अश्या व्यक्ती कधीच बाहेर पडू शकत नाही. मला माझ्या चांगल्या मार्गदर्शनाच श्रेय मिळाल नाही यामुळे ही व्यक्ती दुःखी होते.
आता या चक्रातून बाहेर कसे पडायचे यावर मानसशास्त्रीय उपाय काय आहेत यावर बोलणे अपेक्षित आहे.
जर तुम्ही या परिस्थिती अडकला असाल, तर मानसशास्त्रानुसार काही गोष्टी करणे गरजेचे आहे पहिले सीमा निश्चित करा (Set Boundaries). दोन्ही बाजूंना स्पष्टपणे सांगा की, हा तुमचा वैयक्तिक वाद आहे, आणि मी यात पडू इच्छित नाही. तटस्थ रहा कोणाचीही बाजू घेऊ नका किंवा कोणाचेही निरोप दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे बंद करा. त्यांना थेट एकमेकांशी बोलण्याचा सल्ला द्या किंवा तुम्ही तो विषय सोडून द्या . स्वतःला अलिप्त करा (Detachment) प्रत्येक वाद सोडवणे ही माझी जबाबदारी नाही, माझ्याच एकाच्या धडपड करण्याने माणसं ही बदलणार नाहीयेत आणि परिस्थिती तर कोणीच एकटी व्यक्ती बदलू शकत नाही हे मनाशी पक्के करा. इतरांना बदलण्याची माझी हौस मला खूप मागे खेचते, माझंच मानसिक खच्चीकरण होत आहे हे वेळीच ओळखा.
थोडक्यात सांगायचे तर, ‘मधला माकड होणे’ ही एक अत्यंत तणावपूर्ण मानसिक स्थिती आहे. दुसऱ्यांच्या नात्यातील दरी भरून काढण्यासाठी, स्वतः कमीपणा घेवून इतरांशी मिळते जुळते घेण्यासाठी, सगळ्यांना एकत्र करण्यासाठी, सगळ्यांच्या समस्या सुखं दुःख यात सहभागी होण्यासाठी आपणच जर दरवेळी पुढाकार घेत राहिलो तर त्याचा चुकीचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. स्वतःचा मानसिक बळी देणे थांबवणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे. कोणालाच तुमच्या भावनांशी, तुम्ही काय प्रयत्न करत आहात याच्या शी काहीही घेणंदेणं नसतं. लोकं तुमचा तेवढा विचार पण करत नसतात जेवढा तुम्ही त्यांचा करत असता म्हणून या दलदली मधून बाहेर पडा.
काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
Comments are closed.