
- ‘मसाप’ नाशिक रोड आयोजित ‘संवाद सृजनाशी’ कार्यक्रमामध्ये उलगडला साहित्य प्रवास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड या संस्थेतर्फे” संवाद सृजनाशी” यामध्ये लेखक ॲड. मिलिंद चिंधडे यांनी त्यांचा साहित्य प्रवास उलगडून सांगितला. त्यांनी त्यांच्या एकंदर आठ पुस्तकांचा आढावा घेतला. ते सांगताना त्यांनी त्यांच्या लिखाणाला 53 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त कालावधी झाल्याचे सांगितले. त्याही पूर्वी शाळेपासून वाचनाची आवड लागल्याचे ते म्हणाले. आई, वडील,शाळा आणि शिक्षक यांनी मोठी भूमिका त्याकरता बजावली.
त्यानंतर मनमाड रीडिंग क्लब, काकाणी वाचनालय मालेगाव, मधुकाका कावळे यांचे जनता वाचनालय, सर्वात्मक वाचनालय आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांची अनेक उदाहरणे देऊन वाचन प्रवासाला या सगळ्या संस्थांनी हातभार लावल्याचे सांगितले. हे सगळे करत असताना सगळी स्थानिक वर्तमानपत्रे, ज्यामध्ये चिंधडे यांनी वेळोवेळी आणि वेगवेगळ्या कारणाकरता लिखाण केल्याचे ते म्हणाले.
1998 मध्ये साहित्य परिषदेचे आजीव सदस्य झाल्याचे श्री चिंधडे यांनी सांगून ग्रंथाली, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ललित मासिक यांचाही उल्लेख केला. कोरोना काळात पहिले पुस्तक ” स्वाक्षरीचे जग ” हे प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सात पुस्तकांचा त्यांनी आढावा घेतला आणि ही सगळी पुस्तके आगळीवेगळी आणि वेगवेगळ्या विषयांवरची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. एका प्रकाराने वाचन हा लिखाणाचा रियाज असतो असा महत्त्वाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला.
राजेंद्र सोमवंशी यांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीता पाटील यांनी संस्थेचा परिचय करून दिला. रामचंद्र शिंदे यांनी वक्त्यांचा परिचय केला. रेखा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षस्थानी श्री हेमंत देशमुख हे होते. कार्यक्रमाला नासिक रोड परिसरातील सुमनताई हिरे, प्रा. अविनाश घोलप, ॲड. जयंत वडनेरकर, अजित सावकार, अजित कुलकर्णी इत्यादी साहित्यप्रेमी मंडळी उपस्थित होती.
Comments are closed.