
- सतराव्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून कार्याचा गौरव
- आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्र. शं. तथा बंडोपंत जोशी यांच्या सतराव्या स्मृतिदिनानिमित्त प्रसाद सोशल ग्रुप व श्री गुरुजी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.
महापौर हिमगौरी आडके यांच्या शुभहस्ते शिबिराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. प्रतिकूल राजकीय परिस्थितीत संघर्षातून भाजपचे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत होण्यात दिवंगत बंडोपंत जोशी यांचा सिंहाचा वाटा राहिल्याचे गौरवोद्गार महापौरांनी यावेळी काढले. ज्येष्ठ नेते विजय साने म्हणाले, बंडोपंत जोशी यांच्या व्यापक मार्गदर्शनामुळे आम्हा कार्यकर्त्यांना योग्य दिशा मिळाली. आज नाशिक भाजपमध्ये त्यांच्यासारख्या खंबीर आणि कणखर नेतृत्वाची खरोखर उणीव जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. सावानाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी आपल्या मनोगतात दादांना आपल्यातून जाऊन सतरा वर्ष झाली असली तरी त्यांच्या कार्याचा उचित गौरव आजही कोणीही करू शकले नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांचे नाव एखाद्या सभागृहाला द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जयप्रकाश जातेगावकर यांनी नामको कॅन्सर हॉस्पिटलला श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून त्याकाळी एक कोटी रुपये निधी दादांनी नामको ट्रस्टसाठी आणला होता, याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. गिरीश नातू, गणेश बर्वे, मध्य मंडलाध्यक्ष वसंत उशीर यांनीही दादा यांच्याप्रती आपापल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, सावाना पदाधिकारी डॉ. धर्माजी बोडके, पुस्तक मित्र मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक, नगरसेविका स्वाती भामरे, माजी नगरसेवक योगेश हिरे, मंगला सौदीकर, दीपक कुलकर्णी, हेमंत गोखले, डॉ. गिरीश बच्छाव, समन्वयक मिलिंद जोशी, डॉ. नमिषा शहा आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात नागरिकांची तपासणी करणाऱ्या सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. शिबिरात नेत्र रोग तपासणी, दंत रोग तपासणी व हृदयाशी संबंधित अशा 217 स्त्री-पुरुषांची तपासणी करण्यात आली.
श्री गुरुजी रुग्णालयाला २५ हजारांची देणगी
दरम्यान, श्री गुरुजी रुग्णालयाला दिवंगत बंडोपंत जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्य ₹ २५,००० चा धनादेश प्रदान करण्यात आला.
Comments are closed.