
- दिगंबर जैन मंदिरातील सोन्या-चांदीच्या वस्तूंसह मोबाईल दुकानातून १६ मोबाईल व रोख रक्कम लंपास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
शहरात एकाच रात्री मंदिर आणि मोबाईल दुकानात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्वे क्रमांक ९३ मधील दिगंबर जैन मंदिर तसेच सह्याद्री चौकातील मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. या दोन्ही घटनांतील तीन संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दिगंबर जैन मंदिराच्या बाजूची सिमेंटची खिडकी फोडून मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरातील चांदीचे सिंहासन, चांदीचे पंचमेरू, पद्मावती मातेची सोन्याची पोत, चांदीचे छत्र, दानपेटीतील रक्कम व इतर मौल्यवान ऐवज लंपास केला.दि. ३० सकाळी सुमारे ७ वाजता राजू दगडे हे मंदिरात अभिषेकासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
याच रात्री सह्याद्री चौकातील अभिषेक खुटे यांच्या मालकीच्या जय बाबाजी मोबाईल शॉपचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात दुरुस्तीसाठी आलेले ग्राहकांचे १६ मोबाईल, सुमारे ७०० रुपये रोख रक्कम तसेच इतर साहित्य चोरून नेले.
दोन्ही घटनांतील संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक दीपक पाटील,उपनिरीक्षक किरण साळुंखे, पोलीस कर्मचारी गोसावी, सांगळे तसेच इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या सलग चोरीच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.
Comments are closed.