
** एनजीएन न्यूज नेटवर्क
जीवनात केवळ पैसा आणि प्रतिष्ठा महत्वाची नसते, तर तत्वाधिष्ठित राजकारण एखाद्याला ध्रुवपदावर नेऊन ठेवते, याची दुर्मिळ उदाहरणे लोकशाही प्रणालीत प्रत्ययास येतात. राजकीय निष्ठा ही विश्वासार्हता आणि जनाधाराशी शत-प्रतिशत निगडीत असते, याचे भान ठेवणाऱ्या राजकारण्यांची आज वानवा असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी अशाच उदाहरण साखळीतील निष्ठेचा अनोखा वस्तुपाठ सादर करीत उभ्या मराठी मुलखाच्या गळ्यातील ताईत बनण्याचा बहुमान मिळवला. विरोधी पक्षाचा म्हणून नाना अडचणींचा सामना करूनही दारी आलेल्या सत्तेच्या पालखीत बसण्यास नकार देणारा खासदार म्हणून वाजे यांनी खरेखुरे ‘राज’पद प्राप्त केले. ‘ऑपरेशन टायगर’ची शिकार झालेल्या महाराष्ट्रातील अर्धा डझन सहकाऱ्यांनी ज्या कारणांची ढाल पुढे करून ‘मातोश्री’ची साथ सोडण्याची छाती केली, त्यापैकीच काही कारणे देत राजाभाऊ त्या समूहातील सातवे पाईक बनू शकले असते. मात्र, विवेकी निर्णयातून ते त्यापासून दूर राहिले. त्यांचा हा दृढनिश्चय केवळ सिन्नरच्या वाजे घराण्याचा लौकिक वृध्दिंगत करणारा ठरला असे नाही, तर नाशिकच्या राजकीय इतिहासाचा तो एक मानबिंदू ठरल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ति ठरणार नाही.
केंद्रीय राजकारणात पाळेमुळे आणखी भक्कम करण्याच्या भाजपच्या अविरत प्रयत्नांचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या माध्यमातून ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा अंक अलीकडे महाराष्ट्रात राबवण्यात आला. त्यासाठी काहींना विकासकामे होत नसल्याबद्दल तर काहींचे राजकीय करियरमधील जोखीमेबाबत ‘ब्रेनवॉश’ करण्याची खेळी खेळली गेली. राजाभाऊ वाजे यांना देखील मतदारसंघातील विकासकामांसाठी शंभर कोटींच्या संपुटाचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, ते आणि त्यांचा परिवार कोणत्याही प्रलोभनापासून दूर राहिले. काहीही झाले तरी ‘मातोश्री’ सोबत प्रतारणा करणार नाही, हे राजाभाऊंसह त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी मन वळवण्यास आलेल्या शिंदेंच्या जोडगोळीला निक्षून सांगितले. पिता-पुत्राचा हा पवित्रा वाजे घराण्याच्या प्रतिमा वर्धनास पूरक ठरला. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या नाट्याची अलीकडील ‘ऑपरेशन टायगर’च्या निमित्ताने अपरिहार्यता हाेती म्हणून वाच्यता करण्याची त्यांच्यावर वेळ आली. अन्यथा त्याबाबत ब्र शब्दही न काढण्याचे सामंजस्य आणि परिपक्वता वाजे पिता-पुत्रांमध्ये आहे, हे अवघा नाशिक जिल्हा जाणतो.
‘बोले तैसा चाले..’ अशी राजाभाऊंची ख्याती आहे. ती परिवारात, समाजात, पक्षामध्ये अशी व्यापक स्वरुपाची आहे. त्यांच्या साध्या राहणीमध्ये संयम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि शब्दाला जागण्याची वृत्ती ठायीठायी भरली आहे. शिवसेनेत प्रवेश करतेसमयी ‘शिवबंधन’ बांधताना उध्दव ठाकरे यांनी राजाभाऊ यांना, ‘पक्षात किती दिवस राहणार’, अशी पृच्छा केली हाेती. त्यावर ‘तुम्ही आणि मी जिवंत असेपर्यंत’ असे समयसूचक आणि बाणेदार उत्तर देऊन राजाभाऊ यांनी पक्ष प्रमुखांची शाबासकी मिळवली होती. त्यानंतर राजाभाऊंनी विधानसभा निवडणूका जिंकण्याचा आणि हरण्याचा अनुभव घेतला. पक्षाची शकले झाली. त्यांच्यासोबतचे असंख्य पदाधिकारी इतर पक्षांत शरणागत झाले. राजाभाऊ मात्र अविचल राहिले. कोणत्याही अमिषाने त्यांच्या दृढ निश्चयाचा वेध घेतला नाही. त्याची बक्षिसी त्यांना गेल्या लोकसभा निवडणूकीप्रसंगी पक्षाने नाशिकच्या उमेदवारी स्वरूपात दिली. प्रतिकूल परिस्थितीत राजाभाऊ मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. एका सिन्नरकराने पहिला खासदार होण्याची नोंद केली.
अंतर्बाह्य सरळ मनाच्या राजाभाऊंना खासदारकीचे बिरूद लाभले असले तरी सत्तेत नसल्याचे चटके त्यांना वेळोवेळी बसत असल्याचे सर्वज्ञात आहे. खासदार निधी वगळता इतर विकासनिधीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून अव्याहत आली आहे. मात्र, तरीदेखील त्यांनी संयमाचा कडेलोट होवू न देता पक्षनिष्ठेला नख लागू न देण्याची किंबहुना तसा विचारही मनाला शिवू न देण्याची प्रगल्भता दाखवली आहे. त्यांच्या या विचाराला अव्यवहार्यतेचे लेबल लावणाऱ्यांचीही कमी नाही. पक्षनिष्ठा प्रशंसनीय आहेच, पण मग विकासकामांचे काय, पुढल्या निवडणूकीत मतदारांना काय उत्तरे देणार, त्यांना कोणत्या मुद्द्यांवर सामोरे जाणार असे सवाल निकटवर्तीय राजाभाऊंना करीत असतात. त्यामधील काही मुद्दे वास्तव मानूनही शेवटी ‘पक्षद्रोह’ न करण्याच्या खूणगाठीचे ते संबंधिताना स्मरण करून देतात. दोनदा आमदारकी आणि एकदा खासदारकी अशा तीन निवडणूका लढवताना राजाभाऊ यांना प्रसंगी कर्ज काढण्याची नामुष्की आली. लोकसभा उमेदवारीची विचारणा केल्यानंतर तर आर्थिक मुद्द्यावरून त्यांनी पक्षप्रमुखांना प्रारंभी लढण्यासच नकार दिला होता. पण उध्दव ठाकरेंसह शरद पवारांनी तो भार काहीसा हलका करण्याचा शब्द दिल्यानंतर ते उमेदवारी करण्यास राजी झाले. आज दोन वर्षे होऊनही दखलपात्र कामे झाली नसली तरी त्यांच्यावर निष्क्रियतेचा शिक्का बसलेला नाही. कारण जनतेला वस्तुस्थितीची पुरेशी जाण आहे.
‘ऑपरेशन टायगर’चा भाग न झाल्याबद्दल, पक्षांतरातून सर्वार्थाच्या अभ्युदयावर पाणी सोडल्याबद्दल राजाभाऊ अवघ्या मराठी जनांच्या काैतुकास पात्र ठरले आहेत. नवी दिल्लीतील घडामोडीनंतर नाशिकला परतलेल्या राजाभाऊंचे ज्या जंगी थाटात स्वागत झाले, ते भाग्य एखाद्या मंत्रीपदाची झूल चढवणाऱ्याच्या नशिबीही आले नसावे. समाज माध्यमातही त्यांच्या कृतीची लक्षणीय प्रमाणात दखल घेण्यात आली. काही तासांतील फॉलाेअर्स संख्येत पन्नास हजारांची वाढ होण्यातून त्यांच्या भूमिकेला एकाअर्थी बळ मिळाले. दिवंगत गोविंदराव देशपांडे, यशवंतराव चव्हाण यांनी खासदारकीतून नाशिकचे प्रतिनिधीत्व केल्याचा आदर्शवत इतिहास ऐकवला जातो, त्या रांगेत स्वत:ला तत्वाधिष्ठित राजकीय निष्ठेचा साज चढवत राजाभाऊंनी एकप्रकारे स्थान मिळवले आहे. आज उध्दव ठाकरे यांच्या पक्षाची प्रचंड पडझड झाली आहे. खासदार गेलेत, आमदार फुटलेत, हजारो पदाधिकारी सत्तेची ऊब मिळवण्यासाठी परिवर्तनाच्या लाटेवर स्वार झालेत. पण कौतुक, शब्दसुमने पक्ष आणि तत्व न सोडलेल्या राजाभाऊ यांच्या वाटेला आलीत हे विशेष.
सारांशात, राजकारणाच्या चार पिढ्या अनुभवलेल्या वाजे घराण्याचे पाईक असलेल्या राजाभाऊ यांच्या खासदारकीच्या कर्तृत्वाचा आलेख पाच वर्षांनंतर काय असेल, याचा अदमास आता बांधणे अशक्य असले तरी एका कृतीने ते मतदारसंघातील जनतेच्या चिरस्मरणात राहतील. ‘मातोश्री’वर बांधलेले शिवबंधन हा केवळ मनगटावर बांधायचा धागा नसून पक्ष आणि जनतेप्रती व्यक्त केलेली ती बांधिलकी असते, याचा वस्तुपाठ राजाभाऊंनी थोड्याबहुत फायद्यासाठी निष्ठा बदलणाऱ्या तमाम राजकारण्यांपुढे घालून दिला. त्यांच्या या कृतीची वैयक्तिक निष्ठेशी सांगड घालण्यात येवून राजकारणातील नि:स्वार्थी वृत्तीचे ते मूर्तिमंत उदाहरण म्हणून स्थाननिश्चिती करतील, याबाबत शंका नाही.
Comments are closed.