NGN News
Latest Marathi News

अत्याधुनिक ‘एमआयजीएस’ विभाग अशोका हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित

  • उत्तर महाराष्ट्रातील महिलांना मिळणार जागतिक दर्जाच्या प्रगत उपचार सुविधा


** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महिलांच्या आरोग्यसेवेत नवे पर्व सुरू करत नाशिक येथील अशोका वुमेन एंड चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या अत्याधुनिक 2D, 3D, 4K आणि ICG फ्लुरोसन्स तंत्रज्ञानयुक्त मिनिमली इन्व्हेसिव्ह गायनॅकोलॉजिकल सर्जरी (एमआयजीएस) विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या विभागामुळे उत्तर महाराष्ट्रातील महिलांना जागतिक दर्जाच्या प्रगत स्त्रीरोग उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

मुंबईतील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. मकरंद मसरानी यांच्या हस्ते विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी संचालक डॉ. सुशील पारख, संचालिका अंकिता पारख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर टिळे, आशीष सिंह तसेच रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व हितचिंतक उपस्थित होते.

नवीन विभागामध्ये अत्याधुनिक कार्ल स्तोर्झ रुबिना ® प्रणालीची स्थापना करण्यात आली असून 2D, 3D, 4K Ultra HD आणि ICG फ्लुरोसन्स इमेजिंग तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करणारा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच लेप्रोस्कोपिक विभाग ठरला आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियांमध्ये अधिक अचूकता, सुरक्षितता आणि उत्कृष्ट उपचार परिणाम साध्य होणार असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

यावेळी बोलताना डॉ. सुशील पारख यांनी सांगितले की, MIGS विभागामध्ये हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टॉमी, टोटल लेप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी (TLH), लेप्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी, एंडोमेट्रिओसिस शस्त्रक्रिया, ओव्हेरियन सिस्टेक्टॉमी तसेच जन्मजात विकृतींसाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय ट्यूबल इव्हॅल्युएशन, अॅड्हेसिओलायसिस आणि प्रजनन क्षमता जपणाऱ्या एंडोस्कोपिक शस्त्रक्रियाही येथे केल्या जाणार आहेत.

स्त्रीरोगतज्ज्ञ व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संदीप सोनवणे यांनी सांगितले की, 3D, 4K आणि ICG फ्लुरोसन्स-मार्गदर्शित इमेजिंगमुळे गुंतागुंतीच्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया अधिक अचूक व सुरक्षितपणे करता येतात. या प्रगत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेचा आघात कमी होऊन रुग्ण लवकर बरे होतात तसेच प्रजनन क्षमता जपण्यास मदत होते.

अंकिता पारख म्हणाल्या की, उत्तर महाराष्ट्रातील महिलांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा विभाग सुरू करण्यात आला आहे. उपचारांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील निकष स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे डॉ. मकरंद मसरानी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांमुळे स्त्रीरोग उपचार क्षेत्रात मोठी क्रांती घडली असून हा स्वतंत्र MIGS विभाग महिलांना अधिक सुरक्षित, अचूक आणि प्रजनन क्षमता जपणारे उपचार पर्याय उपलब्ध करून देईल.

या नवीन विभागाच्या स्थापनेमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाच्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार असून, महिलांच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Comments are closed.