
- आठवड्यातून एकदा पाणीकपात प्रस्ताव उंबरठ्यावर; सद्यस्थितीत १३ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका साठा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : लांबलेल्या मान्सूनमुळे राज्यभर पाणीटंचाईचा मुद्दा जिकरीचा बनला असताना नाशिक महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सदर प्रस्ताव आयुक्त आणि महापौर यांच्या समोर सादर केला जाऊन त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसे झाल्यास नाशिककरांना पाणी जपून वापरण्याची वेळ येवू शकते.
‘एल निनो’ च्या प्रभावामुळे यंदा देशभर किमान दहा टक्के पाऊस कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या निर्देशाचा आधार घेत नाशिकचे संपर्क सचिव एकनाथ डवले यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत पिण्याच्या पाणी पुरवठ्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि शेती व अन्य कमी गरजेच्या कामांसाठी आवर्तन न सोडण्याचे आदेशित करण्यात आले आहे. नाशिक महापालिका प्रशासनाने देखील त्याच अनुषंगाने संभाव्य स्थितीवर मात करण्यासाठी पाणी कपातीचा प्रस्ताव पुढे केला आहे. पाणी पुरवठा विभागाने शहरात टप्प्याटप्प्याने पाणी कपातीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु करून लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
केवळ १,२६६ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांत केवळ १,२६६ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा साठा १३ ऑगस्टपर्यंत पुरणार आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत पुरवठा नियोजन करावयाचे झाल्यास १८ दिवसांचा हा तुटवडा भरून काढण्यासाठीच आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव पुढे करण्यात येणार आहे. वेळेत आणि पुरेसा पाऊस न पडल्यास पाणीकपात प्रमाण वाढू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
Comments are closed.