
‘त्या’ दोन कच्च्या दुव्यांवर बोट ठेवल्याची चर्चा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील कथित म्हाडा घोटाळ्यातील सहभाग आणि महापालिका स्थायी समिती सभापती काळातील दोन वर्षांचा कारभार या दोन मुद्द्यांच्या आधारे विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बंड करू पाहणाऱ्या गणेश गीते यांना माघारीसाठी भाग पाडल्याची चर्चा आहे. गीतेंच्या माघारीने महायुती काहीशी सुखावली असली तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने सत्ताधाऱ्यांवर निवडणूक निकालापर्यंत चिंतेचे सावट राहणार आहे.
निवडणूक पार्श्वभूमीवर गेला आठवडाभर मोठ्या घडामोडी घडून आल्या. नाशिकची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यानंतर गीते बंधूनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्याकडे चारशे मतदार असल्याचा ठाम दावा करताना येनकेन प्रकारे आपण निवडणूक लढणारच असा पवित्रा गणेश गीते यांनी घेतल्याने शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांची चिंता वाढली. त्यानंतर शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी नाशकात येवून गीते बंधूंची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न विफल ठरला. अखेर गणेश गीते यांच्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवत त्यांना माघारीसाठी भाग पाडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी म्हाडा घोटाळ्यातील त्यांचा सहभाग, एफआयआर मधून त्यांचे नाव रद्द ठरवण्याचा प्रकार आणि महापालिका स्थायी समिती सभापती काळातील त्यांचा दोन वर्षांचा कारभार हे मुद्दे प्रमाण मानत गीतेंवर दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे. विशेषतः, नगरविकास मंत्रालय खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांनी गीते यांच्या सभापती कार्यकाळातील फाईल्स मागवल्याचे सांगण्यात येत आहे.
गीतेंच्या लेखी लोकप्रतिनिधी कोण ?
माघारीच्या दिवशी गणेश गीते यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली. आपणास लोकप्रतिनिधींनी प्रचंड त्रास दिल्याचे सांगताना म्हाडा घोटाळ्यात जामीन मिळाला असताना तो रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी काहींचा पुढाकार खटकणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. याच कारणामुळे आपण निवडणूक लढवण्यास प्रवृत्त झालो, असे विधानही त्यांनी केले. गीते यांचा रोख पक्षातील आमदारांवर असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे. त्यांच्या आरोपांमुळे भाजपमधील संघर्ष टीपेला पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गोकुळ गीते लढण्यावर ठाम
एकीकडे गणेश गीते यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे लहान बंधू गोकुळ यांनी अर्ज माघारी न घेता निवडणूक रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतली. गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांसह वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सर्वपक्षीय नगरसेवकांशी असलेले त्यांचे संबंध पाहता गीते हे महायुती उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापुढे आव्हान उभे करू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Comments are closed.