NGN News
Latest Marathi News

नाफेड कांदा खरेदी निकष शिथिल; कांदा उत्पादकांना दिलासा

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून नाफेडने कांदा खरेदीसाठी लागू असलेल्या काही जाचक अटींमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. चालू वर्षात अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि कडक उन्हामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी नाफेडला अपेक्षित असलेल्या ‘ए ग्रेड’ दर्जाचा कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा खरेदी केंद्रांवर विक्री करता येत नव्हता.

शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर नाफेडने खरेदी निकषांमध्ये बदल करत कांदा उत्पादकांना दिलासा दिला आहे. नव्या नियमांनुसार पूर्वीपेक्षा कमी दर्जाचा कांदाही खरेदीसाठी पात्र ठरणार असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

नवीन निकषांनुसार यापूर्वी साधारण ५५ मिमी आकाराचा कांदा खरेदी केला जात होता. मात्र आता ४५ मिमी आकाराचा कांदाही खरेदीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच कांद्याचे एक आवरण निघालेले असले तरी तो खरेदीसाठी स्वीकारला जाईल.

याशिवाय कांद्यावर ३० टक्क्यांपर्यंत काजळी असलेला तसेच पृष्ठभागावर ४० टक्क्यांपर्यंत डाग किंवा रंगबदल झालेला कांदाही खरेदी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे १० टक्क्यांपर्यंत चटका लागलेला कांदादेखील आता नाफेडच्या खरेदीसाठी पात्र ठरणार आहे.

नाफेडच्या या निर्णयामुळे प्रतिकूल हवामानाचा फटका बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरेदी केंद्रांवर कांद्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच बाजारातील दबाव कमी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारकडे नाफेडच्या कांदा खरेदी बाबत आणि जाचक अटी शिथिलता आणावी याकरीता पाठपुरवठा केल्याने केंद्र सरकारने नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये शिथिलता आणली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे

-सभापती डी के  जगताप,लासलगाव बाजार समिती

नाफेडने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता बी ग्रेड कांदा खरेदीला हिरवा कंदील दिला आहे.साधारण ५५ मिमी आकाराचा कांदा खरेदी केला जात होता.  आता ४५ मिमी आकाराचा कांदाही खरेदीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

अशोक ठाकूर, संचालक नाफेड नवी दिल्ली

नाफेडने कांदा खरेदीच्या अटी मध्ये शिथिलता आणली आहे याचे स्वागत आहे मात्र कोणत्या दराने खरेदी करणार याबाबत कुठली स्पष्टता दिलेली नाही.

जयदत्त होळकर संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

Comments are closed.