
- आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मौजे आडगाव येथे प्रस्तावित सांडपाणी पंपिंग स्टेशन उभारण्याच्या योजनेला स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून तीव्र विरोध होत असताना, अखेर हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. आमदार ॲड. राहुलभाऊ ढिकले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाशिक महानगरपालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, परिसरातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
नाशिक महानगरपालिकेकडून आडगाव परिसरात सांडपाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पामुळे स्थानिक लोकवस्ती, शेती तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्थानिक शेतकरी व नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.
या पार्श्वभूमीवर स्थानिक शिष्टमंडळाने आमदार ॲड. राहुल ढिकले यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या भावना आणि समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ढिकले यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या विषयाची सविस्तर माहिती देत हस्तक्षेपाची मागणी केली.
आमदार ढिकले यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने तातडीने दखल घेत नाशिक महानगरपालिकेकडून सविस्तर अहवाल मागविला. मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शासनाकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला. अहवालातील निष्कर्ष, स्थानिकांचा विरोध आणि लोकभावना विचारात घेऊन शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिक महानगरपालिकेने प्रस्तावित सांडपाणी पंपिंग स्टेशन प्रकल्प अधिकृतपणे रद्द केला.
या निर्णयामुळे आडगाव परिसरातील शेती, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांचे हित जपले गेले असून, जनतेच्या एकजुटीला आणि लोकप्रतिनिधींच्या प्रभावी पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिक, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
Comments are closed.