
- गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम; भाजप निर्णयाकडे लक्ष
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापुढे विरोधकांना उमेदवार देता आलेला नसताना भाजपच्याच बंडखोराने आव्हान उभे केल्याने बेबनाव निर्माण झाला आहे. आपल्याला पक्ष नेतृत्वाने उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावा करत गणेश गीते यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपमध्येच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी नाशकात धाव घेतली असून ते गीते यांची मनधरणी करणार आहेत. सामंत यांची शिष्टाई सफल ठरते की गुरुवारी नाशकात पोहोचणाऱ्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन महायुतीसाठी ‘संकट मोचक’ ठरतात, याकडे लक्ष लागून राहणार आहे.
संख्याबळाच्या जोरावर नाशिक मतदारसंघ भाजपकडेच राहणार, या आत्मविश्वासापायी आपल्याला प्रदेश नेतृत्वाने उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावा खुद्द गणेश गीते यांनी केला आहे. एव्हढेच नव्हे तर त्यांनी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता थेट अर्ज भरण्याची हिकमत केली. त्यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या नऊ नगरसेवकांची सूचक आणि अनुमोदक म्हणून नावे आहेत. या घडमोडीबाबत प्रदेश नेतृत्वाने हरकत घेत सर्व नगरसेवकांना खुलासा करण्याचे फर्मान काढले आहे. तथापि, गीते हे माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. पक्षातील कोणतीही पदाधिकारी त्यांच्या संपर्कात नाही. भाजप सोबतच आपल्याला इतर पक्षीय नगरसेवकांचा पाठींबा असल्याचा दावा करताना आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी दुपारी नाशिकला येणार असून ते काय भूमिका घेतात, यावर गीतेंच्या माघारीचे गणित अवलंबून राहणार आहे.
गीते हैदराबाद मुक्कामी; निवडणूक लढण्यावर ठाम
दरम्यान, हा पेच सोडवण्यासाठी शिवसेना संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत नाशकात दाखल झाले आहेत. ते या समस्येवर नेमका काय तोडगा काढतात ते पाहणे महत्वाचे ठरेल. तथापि, ज्यांच्या माघारीसाठी सामंत इथे दाखल झाले आहेत, ते गणेश गीते हैदराबाद येथे पोहचले आहेत. ‘एनजीएन’ सोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शिवाय, आपण गुरुवारी सायंकाळी नाशिकला पोहोचणार असल्याचे तसेच निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले. गीते यांचे बंधू गोकुळ यांनीही अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. या सगळ्यावर भाजप नेतृत्व काय निर्णय घेते, हा औत्सुक्याचा भाग ठरणार आहे.
Comments are closed.