
- विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
- अंतिम निर्णय झाला नसल्याने इच्छुकांत धाकधूक वाढली
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रियेंतर्गत सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असताना देखील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्या उमेदवारीचा घोळ संपलेला नाही. एव्हढेच काय दोन्ही बाजूच्या प्रत्येकी तीन पक्षांत नेमके कोण लढणार, हेदेखील स्पष्ट झालेले नसल्याने संभ्रम वाढला आहे. दरम्यान, उमेदवारीचा अंतिम निर्णय रविवारी रात्री उशिरा अथवा सोमवारी सकाळी होणार असल्याचे दोन्ही बाजूच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही बाजूच्या इच्छुकांत यामुळे धाकधूक वाढली आहे.
येत्या १८ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीकडे निर्णायक आघाडी असली तरी उमेदवार भाजप की शिवसेनेचा याबाबत अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. उमेदवारीचा निर्णय राज्यस्तरीय नेते घेणार असल्याने सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागून आहे. इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकून जोरदार लॉबिंग चालवले आहे. भाजपचे एक इच्छुक गणेश गीते यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अजून अंतिम निर्णय झालेला नसताना गीते यांनी उमेदवारी दाखल करणे पक्षाच्या शिस्तीला धरून नसल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. तथापि, आपण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केल्याचे गीते यांनी सांगितल्याने गोंधळात आणखीनच भर पडली आहे.
दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीकडे तोकडे संख्याबळ असल्याने त्यांच्याकडून रिंगणात उतरण्यास फार कोणी इच्छुक नाही. नाशिकची जागा शिवसेना उबाठा पक्षाच्या वाटेला येणार असल्याची शक्यता अधिक असल्याने माजी आमदार वसंत गीते यांनी ‘मातोश्री’ कडून आलेल्या सूचनेनुसार शनिवारी अर्ज दाखल केला. शिवाय, निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनीही अर्ज घेतला आहे. वसंत गीते यांनी यापूर्वी हि निवडणूक लढली असल्याने पुन्हा त्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता अधिक आहे.
गाफील ठेवण्याच्या भाजप रणनीतीची चर्चा..
नाशिक महापालिका निवडणुकीच्या वेळी महायुतीची मोट बांधली जाईल, अशा आशेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या सवंगड्यांना शेवटपर्यंत तिष्ठत ठेवून अखेर भाजपने स्वबलाचा नारा दिला होता. त्याच फोर्मुल्याचा अवलंब करत इतर दोन्ही घटक पक्षांना गाफील ठेवून अखेरच्या टप्प्यात स्वतःचा उमेदवार जाहीर करण्याची रणनीती भाजपने अवलंबली आहे. त्याची शनिवारी तीनही पक्षात चर्चा होती. मुंबईत होणार्या अंतिम निर्णयाकडे आता तीनही पक्षांचे लक्ष लागून राहणार आहे.
Comments are closed.