
- उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा स्तुत्य उपक्रम; ग्रामस्थ आणि पालकांकडून स्वागत
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू असल्याचे आपण नेहमीच ऐकतो; मात्र नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी गावातील नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक आणि सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांनाही वाचनाची संधी मिळावी या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबवला आहे.
त्यांनी गावातील मारुती मंदिरात सुमारे ५०० पुस्तकांचे खुले वाचनालय सुरू केले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम लोकसहभागातून साकार झाला आहे. वाचनालयासाठी आवश्यक असलेली दोन कपाटे उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी उपलब्ध करून दिली, तर विविध दर्जेदार आणि वाचनीय पुस्तके वैशाली प्रकाशनचे अध्यक्ष विलास पोतदार तसेच विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने मिळाली.
मंदिर परिसरात पुस्तके सुबकपणे ठेवण्यात आली असून ग्रामस्थांना त्यांच्या सोयीच्या वेळी पुस्तके घेऊन वाचता येतील आणि वाचून झाल्यावर पुन्हा ठेवता येतील, अशी मुक्त व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल, मोबाइलच्या अतिरेकी वापरापासून लोक दूर जातील आणि पालक वाचन करताना पाहून विद्यार्थ्यांनाही वाचनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी व्यक्त केला.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव यांनी मार्गदर्शन केले, तर सहशिक्षिका वैशाली भामरे, अमित शिंदे आणि सोनाली गांगुर्डे यांनी मोलाचे सहकार्य केले. वाचनालयात विज्ञान, इतिहास, प्रेरणादायी साहित्य, विविध ज्ञानवर्धक पुस्तके, शास्त्रज्ञांची चरित्रे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान आदी विषयांवरील पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी( दि २९ ) रोजी या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा आनंदवलीतील ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी वैशाली प्रकाशनचे अध्यक्ष विलास पोतदार, ग्रामस्थ नारायण जाधव, शरद बेंडकोळी, दशरथ लोखंडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल शाळेचे आभार मानत वाचनालयाची जबाबदारी स्वीकारली. भविष्यात अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे मत व्यक्त करत मनपा प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कोरोना काळात श्रीमती कुंदा बच्छाव या दररोज पुस्तकांचा संच घेऊन मारुती मंदिरात जात असत आणि ग्रामस्थांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देत असत. त्या काळात अनेक ग्रामस्थ व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशी पुस्तके कायमस्वरूपी उपलब्ध असावीत, अशी इच्छा व्यक्त केली होती. गावकऱ्यांची ही मागणी आणि वाचनाविषयीचा त्यांचा उत्साह पाहून श्रीमती बच्छाव यांनी तेव्हाच गावकऱ्यांसाठी कायमस्वरूपी खुले वाचनालय सुरू करण्याचा संकल्प केला होता. अनेक वर्षे मनात जपलेले हे स्वप्न अखेर लोकसहभागाच्या माध्यमातून साकार झाले असून आज मारुती मंदिरातील खुले वाचनालय उपक्रम वाचन संस्कृती जपणारा आणि मोबाइलमुक्त समाज घडविणारा हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Comments are closed.