NGN News
Latest Marathi News

भुजबळांना राज्यसभा आणि पुतण्याचे मंत्रिपदही हवेय !

  • दिल्लीत पक्षाचा आवाज बनण्याची संधी मिळणे शक्य; पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाकडे लक्ष

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आता केंद्रीय राजकारणात जायचे वेध लागले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेवर कोणी जायचे, या मुद्द्यावर खल सुरु असताना भुजबळ यांनी तशी तयारी दाखवल्याची चर्चा आहे. तथापि, आपण राज्यसभेवर गेल्यास पुतण्या समीर यास राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करावे, अशी आग्रही मागणी भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याची माहिती पुढे आली आहे.  

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा दिल्लीतील आवाज म्हणून दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही जोडगोळी सर्वपरिचित होती. तथापि, पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्यानंतर अवघी समीकरणे बदलली. पटेल आणि तटकरे तूर्तास पक्ष नेतृत्वाकडून बेदखल झाले आहेत. स्वाभाविकच, पक्षाचा दिल्लीतील चेहरा म्हणून कोणाला तरी प्रोजेक्ट करण्याचा विचार नेतृत्व करीत आहे. अशातच राज्यसभेची जागा रिक्त असल्याचा योग साधत भुजबळ यांनी पहिल्यांदाच केंद्रीय राजकारणात जाण्यासाठी रस दाखवल्याचे बोलले जाते. भुजबळ यांच्या माध्यमातून देशभर ज्ञात असलेला चेहरा दिल्लीत दिल्यास पक्षालाही त्याचा लाभ होईल. तथापि, आपली राज्यसभेवर वर्णी लागल्यास पुतण्या समीर भुजबळ यास महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या या भूमिकेला सुनेत्रा पवार कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

.. तर समीर यांचे राजकीय पुनर्वसन

छगन भुजबळ हे २००४ पासून नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. या मतदारसंघात त्यांची मांड पक्की असल्याचे मानले जाते. उद्याच्या राजकारणात ते राज्यसभेवर गेल्यास येवल्यात पोटनिवडणूक होऊन समीर भुजबळ यांना पक्षातर्फे रिंगणात उतरवले जावू शकते. समीर भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. गेल्यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तथापि, त्यांना शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षाने भुजबळ यांना राज्यसभेत आणि समीर यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतल्यास समीर यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते.

Comments are closed.