
- कुंभमेळ्यापूर्वी नाशिककरांना मोठा दिलासा; खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्याला यश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अखेर महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील द्वारका ते नाशिकरोड या अत्यंत वर्दळीच्या मार्गाच्या सहापदरीकरणाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानंतर नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामागे राजाभाऊ वाजे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
द्वारका ते नाशिकरोड हा मार्ग शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या प्रमुख रस्त्यांपैकी एक मानला जातो. दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या परिसरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडत असल्याची परिस्थिती होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनासाठी या मार्गावर अखंड उड्डाणपूल तसेच मेट्रो प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे त्यांनी वारंवार केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. द्वारका ते दत्त मंदिर चौक या मार्गावरील उड्डाणपूल हा भविष्यातील कायमस्वरूपी उपाय असल्याचा आग्रहही त्यांनी कायम ठेवला होता.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, संबंधित प्रकल्पाचा खर्च अत्यंत मोठा असून तो दीर्घकालीन स्वरूपाचा असल्याचे मत केंद्र शासनाने नोंदविले. सचिव स्तरावरील बैठकीत तातडीने उड्डाणपूल व मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देणे वेळेअभावी शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
तथापि, कुंभमेळ्यापूर्वी नाशिककरांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी खासदार वाजे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर त्यांच्या आग्रहाला यश मिळाले असून, तत्पुरत्या उपाययोजनेच्या स्वरूपात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० चे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्विस रोड उभारण्यात येणार असून, त्यामुळे द्वारका ते दत्त मंदिर हा संपूर्ण मार्ग प्रत्यक्षात आठ पदरी होणार आहे. या कामासाठी तब्बल २२१.५२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः यासंदर्भात ‘एक्स’ या समाजमाध्यमावर माहिती देत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडणार असल्याचे मानले जात आहे.
—
नाशिक शहरातील वाढती वाहतूक आणि आगामी कुंभमेळा लक्षात घेता या रस्त्यावरील कोंडी सोडविणे अत्यंत आवश्यक होते. माझी प्राथमिक मागणी अखंड उड्डाणपुलाची होती आणि आजही ती कायम आहे. मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेऊन किमान रस्त्याची रुंदी वाढविण्याचा पर्याय पुढे रेटला. त्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला, याबद्दल मंत्री नितीन गडकरी यांचे आभार,”
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
उड्डाणपूल, मेट्रोची मागणी कायम
या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानतानाचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, मेट्रो प्रकल्प आणि अखंड उड्डाणपूल हेच नाशिकच्या भविष्यातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उत्तर असल्याचे सांगत, त्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकरोड ते द्वारका अखंड उड्डाणपूल व्हावा यासाठी कुंभमेळ्यानंतर त्वरित मंजुरी मिळावी यासाठी आतापासूनच पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार वाजे यांनी केलाय.
Comments are closed.