NGN News
Latest Marathi News

चांदवडला शेतकरी क्रांती महामोर्चा; कांदा दरप्रश्नी महामार्ग रोखला

  • मविआतील बड्या नेत्यांसह शेकडो शेतकरी सहभागी
  • रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

चांदवड : कांद्याला योग्य हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मंगळवारी ( दि. २६ ) शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मविआच्या अनेक नेत्यासंह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. सकाळपासून सुरू झालेल्या या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरत तेथील गाड्यांची हवा काढण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला आक्रमक वळण मिळाल्याचे चित्र दिसले.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आले. या महामोर्चात शिवसेना नेते आ. अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, निलेश लंके आणि शोभाताई बच्छाव हेदेखील सहभागी झाले.

कांद्याच्या माळा घालत आंदोलन
यावेळी अनेक नेत्यांनी यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्याचे दिसून आले. काही नेते बैलगाडीवर बसले होते. सरकारने कांद्याचे प्रति किलोचे दर 24 रुपयांपर्यंत घेऊन जावेत, ही आमची आग्रही मागणी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.गळ्यात कांद्यांच्या माळा घालून, जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. कांद्याला समाधानकारक हमीभाव मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात आंदोलकांनी महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार, अंबादास दानवे यांना जबरदस्तीने पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आले. मात्र आम्हाला पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं तरी देखील आम्ही आगेकूच करणारच, असा निर्धार या मोर्चेकरांनी व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय म्हणाले नेते ?

 @ राज्य शासनाचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. या मोर्चाचे नेतृत्व सामान्य शेतकरी करत आहेत, आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सरकारने कांद्याला 24 रुपये भाव देण्याचे आश्वासन दिलले होते, मात्र आता १५ रुपयांचा दर दिला जातोय. मोर्चानंतर सरकारवर दबाव आल्याने दरात थोडी वाढ झाली, पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही. नाफेडकडून फक्त 2 लाख टन कांदा खरेदी होणार आहे. शेतातून बाजारापर्यंत कांदा आणण्यासाठीच लाखो रुपयांचा खर्च होतो. पुढील काही वर्षे शेतकऱ्यांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न आहे.

  • आ. रोहित पवार

@ ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है.. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार नाही. सरकार दिलेले आश्वासन पाळायलाही तयार नाही. आणि जाब विचारणाऱ्यांना, सत्याग्रहींना पोलिस ताब्यात घेऊन कारवाई करत आहे,

  • हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस

 @ शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकार भाव जाहीर करत आहे, पण प्रत्यक्षात खरेदी होत नाही. केवळ घोषणा करून काही उपयोग नाही.

  • आ. अंबादास दानवे, शिवसेना नेते

Comments are closed.