NGN News
Latest Marathi News

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : भाजप- शिवसेनेतच लढत ?

  • ५८१ मतदार ठरवणार नाशिकमधील तिसरा विधान परिषद सदस्य

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक सोमवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीचे नगरसेवक हे मतदानास पात्र असलेल्या या निवडणूकीत जिल्ह्यातील बलाबल पाहता हा मुकाबला राज्याच्या सत्तेमधील भाजप आणि शिवसेना यांच्यातच होण्याची दाट शक्यता आहे. सध्या ही जागा नरेंद्र दराडे यांच्या रूपाने शिवसेनेच्या ताब्यात असून भाजपतर्फे त्यांच्याविरोधात कोणाला मैदानात उतरवले जाते, याची जिल्ह्यात उत्कंठा आहे. तूर्तास ५८१ मतदार जिल्ह्यातील तिसरा विधान परिषद सदस्य ठरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरक्षण मुद्द्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तब्बल दोन वर्षे रखडल्याने नाशिकची जागा देखील रिक्त होती. तथापि, आधी नगर परिषदा आणि नगर पंचायती तसेच पुढील टप्प्यात महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर सोमवारी या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. नाशिक महापालिकेतील १२२, मालेगाव महापालिकेतील ८४ आणि जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीचे ३७७ असे मिळून ५८१ मतदार निवडणूकीत मतदान करतील. मुळात या निवडणुकीचे गणित मेरीट पेक्षा आर्थिक ताकदीवर अवलंबून असल्याने त्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरवला जातो. गेल्यावेळी अर्थात २०१८ मध्ये तत्कालीन एकसंध शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुध्द एकसंध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजी सहाणे यांच्यात लढत झाली होती. दराडे यांनी ती निवडणूक एकहाती जिंकली होती. यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे. शिवसेनेकडून दराडे इच्छुक असल्याची माहिती आहे, तर भाजपकडून गणेश गीते, सुरेश पाटील ही नावे पुढे आली आहेत. दोहोंत लढत झाल्यास राज्याच्या सत्तेतील भागीदार समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

.. तर निवडणूक कमालीच्या चुरशीची होणार

अर्थात, सर्वार्थाने तुल्यबळ असलेल्या या नावांची चर्चा असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस ( १०१ ), शिवसेना ( उबाठा ) ( ४७ ), इस्लाम पार्टी ( ३५), राष्ट्रवादी कॉंग्रेस ( १६ ) हे पक्ष कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित पक्षांचा भाजपविरोधी अजेंडा ठरला तर निवडणूक कमालीच्या चुरशीची होवू शकते. जिंकण्यासाठी आवश्यक २९२ चा जादुई आकडा गाठण्यासाठी दोन्ही बाजूंना मोठी कसरत करावी लागेल.

शिवसेनेचा दावा; शिंदे निर्णय घेणार

दरम्यान, सोमवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या खा. श्रीकांत शिंदे यांनी या जागेवर आमच्याच पक्षाचा दावा असल्याचे स्पष्ट केले. याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत तूर्तास नरेंद्र दराडे हेच उमेदवार असतील, अशी स्थिती आहे.

Comments are closed.