NGN News
Latest Marathi News

बागलाणमधील गारपिटीची मंत्री भुसे, आ. बोरसे यांच्याकडून पाहणी

  • नुकसानीचे सरसकट पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे तहसीलदारांना आदेश

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

बागलाण तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मंत्री दादा भुसे व आमदार दिलीप बोरसे यांनी स्वतंत्रपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून तातडीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून अहवाल पाठवावा असे आदेश तहसीलदार कैलास चावडे यांना दिले आहेत.

सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस व गारपिटीमुळे शहराच्या लगतच असलेल्या भाक्षी शिवारात कांदा, गहू, हरभरा, डाळिंब व द्राक्ष पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काढणीसाठी तयार असलेल्या कांद्याची पात पूर्णपणे छाटली गेली असून गारपिटीमुळे कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर बहरलेल्या डाळिंब बागेची फुले व फळे गळून पडले आहेत. तसेच तरसाळी, कौतिक पाडे, मुलाने, चौगाव, येथेही उपरोक्त पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे उभी पिके भुईसपाट झाली असून कलमी आंब्यांचा झाडाखाली कैऱ्यांचा सडाच पडलेला दिसून आला.

वादळी वाऱ्यामुळे आंबा, नीम व बाभूळ यासारखे मोठमोठे वृक्ष ही कोलमडून पडले आहेत. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भाक्षी शिवारातील अपंग शाळेजवळील नाल्याला पूर आला होता त्यामुळे सटाणा नामपुर रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. तर शहरातील नामपुर रोडवरील संकल्प बिल्डिंगमधील चारही दुकानामध्ये कमरे इतके पाणी शिरले होते. त्यामुळे दुकानात काम करणारी एक महिला आतच अडकली होती. मात्र प्रसंगावधान राखून परिसरातील नागरिकांनी तिला बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

भाक्षी ग्रामपंचायतचे सदस्य रावण पवार यांच्या शेतात झालेल्या गारपिटीमुळे क्रांती अभय सोनवणे यांच्या पाच शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर काही ठिकाणी पशुपक्षी व मोरही मृत्युमुखी पडले आहेत. तसेच हेमंत जगदीश रौंदळ यांचे जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी असलेले पत्र्यांचे शेडही कोलमडून पडले आहे.

दरम्यान वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांबही आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी गावातील वीज पुरवठा सोमवारपासूनच खंडित झालेला आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झालेली असताना विज पुरवठाही खंडित झालेला असल्यामुळे काही ठिकाणी महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची ना मुश्कि ओढवली आहे.

Comments are closed.