NGN News
Latest Marathi News

देवळाली आनंद रोडचे काम पुन्हा सुरू होणार; सर्वानुमते निर्णय

** पुरुषोत्तम कांडेकर

देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या तीन वर्षापासून वादात असलेला देवळाली कॅम्पचा आनंद रोड खराब झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडर एन. आर. पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी, बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे व अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आनंद रोडचे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे करीत असताना या रोडवर झालेला दोनशे मीटरचा रस्ता व त्याचे झालेले काम लक्षात घेऊन पुढे देखील या दर्जाप्रमाणे काम करावे असे निश्चित करण्यात आले. आगामी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या आनंद रोडच्या कामाचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी होत्या. रस्ता वर्षभरातच फुटला होता. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करून रस्ता दुरूस्तीचे आदेश ठेकेदाराला दिले होते. दुरूस्तीचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू होऊन दोनशे मीटरचा रस्ता पूर्ण झाला. पुढील काम सुरू होत असताना काही नागरिकांनी काम थांबवले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अनेकांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे यांनी पुढाकार घेत या नागरिक, देवळालीतील सामाजिक संघटना, ठेकेदार यांची बोर्डामध्ये एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला बोर्डाचे ब्रिगेडियर, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी आदी उपस्थित होते.

नागरिकांनी रस्ता योग्य पद्धतीने बनवून घेऊन अडचणी दूर करण्याची मागणी केली. ज्या सोसायटी जवळ भूमिगत गटार अथवा जलवाहिनी टाकायच्या असतील तेथे पर्यायी व्यवस्थेची मागणी केली. ठेकेदारांनी ती मान्य केल्याने रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर एन.आर.पांडे यांनी काम दर्जेदार करण्याची सूचना केली. सचिन ठाकरे म्हणाले की, आनंद रोड पाठोपाठ वडनेर रोड व शिंगवे बहुला येथील रस्त्याचे काम प्राधान्याने होणे महत्त्वाचे आहे. ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार असले तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अभियंत्याची देखरेख गरजेची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी म्हणाले की, ही कामे होणे गरजेचे असून प्रलंबित ठेवल्यास जनतेची अडचण होऊन निधीदेखील थांबला जातो. नागरिकांचा देखील सहभाग विकास कामांत महत्त्वाचा आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, व्यावसायिक मंगेश गुप्ता, सोमनाथ मोजाड, संदीप कदम, जिशान खान, चंदू जाधव, गोकुळ मोजाड, निलेश बंगाली, संदीप चौधरी, राजू जाधव, पंडित साळवे, किरण मोजाड, दीपक तोलानी, मूलचंद निहलानी आदी उपस्थित होते.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डातही खासदार,आमदार यांना काम करताना बोर्डाची एनओसी घ्यावी लागते. मात्र, काम दर्जेदार होत नसल्याने अशी एनओसी द्यावी की नाही हा प्रश्न महानगरपालिकेप्रमाणे आता कॅन्टोन्मेंट बोर्डातही ऐरणीवर येऊ पाहत आहे.

आमची बांधिलकी जनतेशी

कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या चार वर्षापासून लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात कोणती कामे महत्त्वाची आहेत याची वर्गवारी होत नाही. खासदार, आमदार हे येथील जनतेसाठी निधी उपलब्ध करून आणतात. मात्र, सदरचे काम कॅन्टोन्मेंट बोर्डाऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून होत असल्याने कामाचा दर्जा व वेळेचे बंधन याबाबत बोर्डाला काही करता येत नाही. यासाठी एनओसी देताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिका-यांच्या सुपरव्हिजन खालीच हे काम होणे गरजेचे आहे.
सचिन ठाकरे, नामनिर्देशित सदस्य, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड.

Comments are closed.