** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. ७ मार्च) महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक डॉ. अगस्टीन पिंटो व संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने तसेच पवित्र ग्रंथ बायबलमधील वचन पठणाने झाली. यानंतर विद्यालयातील पुरुष सहकारी शिक्षकांनी सर्व महिला शिक्षकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सन्मान केला व स्त्रीशक्तीचा गौरव केला. यावेळी विद्यालयाच्या संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा तसेच त्यांना प्राप्त झालेल्या विविध पुरस्कारांचा शिक्षकांनी आपल्या मनोगतातून गौरवपूर्ण उल्लेख केला.
महिला दिनानिमित्त डॉ. ग्रेस पिंटो यांनी महिला शिक्षकांसाठी पाठविलेल्या विशेष संदेशाचे वाचन शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील यांनी केले. आपल्या संदेशात त्यांनी स्त्रीला सामर्थ्यशाली व आधुनिक युगाची शिल्पकार संबोधत, स्त्रियांनी आपल्या आंतरिक शक्तीचा उपयोग समाजरक्षण व देशकल्याणासाठी करावा, असे आवाहन केले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभागप्रमुख भाग्यश्री मराठे व शितल चिंचोलीकर यांनी विशेष प्रयत्न केले.
Comments are closed.