** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ७ मार्च २०२६ रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक डॉ. अगस्टीन पिंटो सर व संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मान्यवर अतिथी म्हणून समुपदेशक मिथिला डोणगावकर, धनश्री राठी, डॉ. मिथिला चव्हाण, विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल बोरसे व ऋचा शुक्ला तसेच रेव्हरंड संजय गावित उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र ग्रंथ बायबलमधील वचन पठण करण्यात आले. पुढे रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारी नाटिका सादर केली. यासह इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद उपस्थित पालक व प्रेक्षकांनी लुटला. वर्षभरात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम वाद्य वादक, उत्तम संगीतकार, उत्तम वाचक, उत्तम वक्ता, उत्तम तंत्रस्नेही, अनुशासनप्रिय विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर, सुंदर गायिका अशा विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली.
पूर्व-प्राथमिक विभाग ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधून विद्यालयाचे ‘प्रिन्स’ व ‘प्रिन्सेस’ निवडण्यात आले. इयत्ता सहावीमधून प्रिन्सचा किताब श्रेयश मांडवडे तर प्रिन्सेसचा किताब शौर्य कटारे हिला देण्यात आला. इयत्ता सातवीमधून अनुज जाधव व काव्या नायर, इयत्ता आठवीमधून तेजस पाटील व काव्या सिंग, तर इयत्ता नववीमधून तेजस्वी जाधव व चैतन्य कोतकर यांची निवड करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे तसेच प्राथमिक विभाग प्रमुख शीतल चिंचोलीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.