** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असतानाच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे पाण्या अभावी शेतकऱ्यांची कांदा, गहू, भुईमूग यासारखी रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाक्षी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच चेतन वनीस यांनी दिला आहे.
बागलाण तालुक्यात गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात उन्हाळ कांदा, गहू, भुईमूग, मका यासारख्या पिकांची लागवड केलेली आहे. विहिरींना यावर्षी पुरेसे पाणी असल्यामुळे पिकेही बहरलेली आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिकांना आठ दिवसा ऐवजी चार ते पाच दिवसात पाणी द्यावे लागत आहे. परंतु सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी देणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांनी शेतात विद्युत पंप सुरू केल्यानंतर पिकांसाठी वाफ्यात पाणी पोचण्याच्या आतच विद्युत पुरवठा खंडित होत आहे. सततच्या खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे.
वीज पुरवठ्याच्या वेळेतील बदल
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांसाठी गेल्या काही दिवसांपासून सकाळी सहा ते साडेबारा वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जात होता. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून या वेळेत बदल करण्यात आलेला असून पूर्वीप्रमाणेच तीन दिवस दिवसा व तीन दिवस रात्री विज पुरवठा केला जात आहे. मात्र ठरलेल्या निर्धारित वेळेतही सातत्याने विजेचा लपंडाव सुरू राहत असल्यामुळे पिकांना अंतिम टप्प्यात पुरेसे पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे उपरोक्त सर्वच पिकांना त्याचा फटका बसणार असून उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान सातत्याने खंडित होणाऱ्या विज पुरवठ्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वरीद्वारे संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
Comments are closed.