- निलगिरी बाग जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू राहणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या निलगिरी बाग जलशुद्धीकरण प्रकल्पातून द्वारका परिसरात होत असलेला पाणीपुरवठा यापुढे सुरूच राहणार आहे. पुरेशा जलसाठ्याअभावी पंचवटीतील नगरसेवकांनी हा पुरवठा द्वारका परिसरात सुरु ठेवण्यास विरोध दर्शविला होता. तथापि, शिवसेना ( उबाठा ) नगरसेविका सीमा पवार आणि विशाल पवार यांनी विशेष प्रयत्न करून खंडित होऊ पाहणारा द्वारकावासियांचा पाणीपुरवठा तूर्त कायम ठरवण्यात यश मिळवले आहे. मात्र, भविष्यात द्वारका परिसरात पाणीसमस्या गंभीर होऊ शकते, ही बाब यानिमित्त पुढे आली आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वाभाविकच पाणी पुरवठ्यासारख्या मुलभूत सेवेवर देखील त्याचा ताण वाढत आहे. पंचवटी परिसराला महापालिकेच्या निलगिरी बाग जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तथापि, या परिसरातील नागरी वस्ती वाढत असल्याने या प्रकल्पातून द्वारका परिसरात होत असलेला सकाळचा पाणीपुरवठा बंद करण्याची शिफारस पंचवटीतील नगरसेवकांनी केल्याने पेच निर्माण झाला. तसा निर्णय प्रत्यक्षात अमलात आणण्यास प्रारंभ देखील झाला होता. परिणामी द्वारका परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती.
सदर बाब कळल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) नगरसेविका सीमा पवार आणि विशाल पवार यांनी तातडीने पावले उचलली. पंचवटीतील नगरसेविका प्रियांका माने आणि धनंजय माने यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून पवार दाम्पत्याने पाणी टंचाईमुळे निर्माण झालेली वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत दोन्ही नगरसेविका तसेच विशाल पवार आणि धनंजय माने यांनी योग्य त्या सूचना देत द्वारका परिसरात होत असलेला पाणीपुरवठा तूर्तास सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर द्वारका परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत नगरसेविका सीमा पवार आणि विशाल पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तथापि, हा पाणी पुरवठ्याचा मुद्दा तूर्तास निकाली निघाला असला तरी भविष्यात द्वारका परिसरात पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते, ही बाब यानिमित्त पुढे आली आहे. यासाठी द्वारका परिसराला कायमस्वरूपी पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी नवा पर्याय निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Comments are closed.