** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव मंडलातील हिंदू बांधवांच्या वतीने मंगळवार (दि. ३ मार्च) रोजी परमपूज्य भगरी बाबा मार्केट यार्डच्या विस्तीर्ण पटांगणावर भव्य हिंदू संमेलन उत्साहात पार पडले.
संमेलनात दोन प्रमुख व्याख्याने झाली. प्रमुख व्याख्याते ह. भ. प. सोपान दादा कनेरकर आणि केदारजी कुलकर्णी यांचे ढोल-ताशा, झांजर पथक व पुष्पवृष्टीसह भव्य शोभायात्रेत स्वागत करण्यात आले. प्रारंभी भारतमाता व लासलगावचे आराध्य दैवत परमपूज्य श्रीसंत भगरीबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
व्यासपीठावर बहुरूपी महाराज, ह. भ. प. गणपत महाराज नागरे, ह. भ. प. शाम महाराज गांगुर्डे, चेतन महाराज महानुभाव व ह. भ. प. विक्रम काळे उपस्थित होते. प्रमुख व्याख्यातांचा सन्मान शहीद जवानांचे पालक गोपाळा निंबाजी गोरडे, जनाबाई गोपाळा गोरडे तसेच उत्तम बाबुराव ढोमसे व चेतन जनार्धन ढोमसे यांच्या हस्ते करण्यात आला.
केदार कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या स्थापनेपासून आजवरच्या राष्ट्रभक्तीपर, धार्मिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. सन २०२५–२६ हे संघाचे शताब्दी वर्ष असून, त्या निमित्ताने देशभर सकल हिंदू संमेलने आयोजित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
ह. भ. प. सोपान कनेरकर यांनी हिंदू एकतेचे महत्त्व, धर्म-संस्कृतीचे पालन, पाश्चात्त्य आचार टाळणे, सण शांततेने साजरे करणे तसेच स्त्री-स्वसंरक्षणाबाबत प्रबोधन केले. “भारत विविधतेत एकता जपणारा देश आहे; आपण सर्व हिंदू आहोत,” असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”च्या घोषणांनी परिसर दुमदूमला. यावेळी लासलगाव मंडलातील हजारो श्रोते उपस्थित होते.
Comments are closed.